नंदुरबार l प्रतिनिधी-
नवापूर पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अवैधरित्या वाहतूक होणारी तब्बल 26 लाख 800 रुपये किमतीची रॉयल ब्लू दारू बोलेरो वाहनासह जप्त केली आहे. या प्रकरणी धुळे जिल्ह्यातील एका संशयितास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, नवापूर तालुक्यातील कोळदा-धनराट रोडवरून बोलेरो क्रमांक एमएच ०६ बीडब्ल्यू ४४५४ मधून अवैधरित्या रॉयल ब्लू दारूची चोरटी वाहतूक होणार आहे. माहिती खात्रीशीर असल्याने पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकाला कारवाईसाठी रवाना केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पंचांसह कोळदा-धनराट रोडवरील सुळी फाट्याजवळ सापळा रचून थांबले होते. दरम्यान, कोळदा गावाकडून येणारी पांढऱ्या रंगाची बोलेरो वाहन दिसताच पोलिसांनी हाताचा इशारा देऊन ती थांबवली. वाहनाचा क्रमांक मिळालेल्या माहितीप्रमाणेच असल्याचे निष्पन्न झाले.
वाहन चालकाने आपले नाव शिवाजी बाबूलाल चौधरी (रा. बेटावद, ता. शिंदखेडा, जि. धुळे) असे सांगितले. वाहनात काय आहे, अशी विचारणा केली असता त्याने भाताच्या सालाच्या गोण्या असल्याचे सांगितले. मात्र चालकाच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये रॉयल ब्लू कंपनीच्या दारूचे तब्बल 198 खोके आढळून आले.
या कारवाईत पोलिसांनी दारूसह बोलेरो वाहन असा एकूण 26 लाख 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि मुकेश पवार तसेच पोहेकॉ जितेंद्र तांबोळी, बापू बागुल, जितेंद्र तोरवण आणि नितीन गांगुर्डे यांनी केली.








