नंदुरबार l प्रतिनिधी
एका लहानशा खेड्यात सधन शेतकरी कुटूंबात जन्मलेली व्यक्ती नंदुरबार मधील एका मोठ्या महाविद्यालयात प्राध्यापक होते, ही गोष्ट आज विशेष वाटणार नाही. परंतू ज्या काळात बहुजन समाजातील पहिलीच पिढी उच्च शिक्षणात आली, त्यावेळेस त्यांच्यासमोर अनंत अडचणी होत्या. विशेषतः योग्य मार्गदर्शनाचा अभाव. तरीही माजी प्राचार्य सखाराम गोविंद पाटील यांनी सर्व अडचणीतून मार्ग काढला. प्रत्येक व्यक्तीसाठी मोठं समाधान देणारी गोष्ट म्हणजे आपल्या वाट्याला आलेल्या आयुष्यापेक्षा आपल्या मुला, बाळांना अधिक चांगलं आयुष्य मिळावं हे असते. आणि हेच गुपित ‘सुखी जीवनाची गुरुकिल्ली’ या पुस्तकात दडलंय, असे प्रतिपादन माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील यांनी केले. ते येथील इंदिरा गांधी मंगल कार्यालयात पुस्तक प्रकाशन प्रसंगी बोलत होते.
येथील निवृत्त प्राचार्य सखाराम गोविंद पाटील यांचे लिखित सुखी जीवनाची गुरुकिल्ली या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त प्राचार्य पी.एन.देशपांडे, ज्येष्ठ साहित्यीक डॉ.पितांबर सरोदे, पोलीस उपअधिक्षक संजय महाजन, पत्रकार रमाकांत पाटील, ऋद्र क्रिएशनचे संचालक योगेश्वर जळगांवकर उपस्थित होते.
सुखी जीवनाची गुरुकिल्ली या पुस्तकामध्ये गुर्जर समाजाची उत्पत्ती, राहणीमान व वास्तव्य याविषयी सखोल माहिती लिहिण्यात आली आहे. यात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी माजी प्राचार्य पी.एन.देशपांडे, ज्येष्ठ साहित्यीक डॉ.पितांबर सरोदे, प्रा.ए.डी.बांदल (हैद्राबाद), पत्रकार रमाकांत पाटील, पोलीस उपअधिक्षक संजय महाजन, पत्रकार प्रेमचंद राजपूत यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रा.गुलजारसिंग राजपूत, प्राचार्य बी.एस.पाटील, शेतकी संघाचे चेअरमन बी.के.पाटील, प्राचार्य एस.एन.खैरनार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.सविता पटेल यांनी केले. तर आभार स.गो.पाटील यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंजि.प्रशांत पाटील, डॉ.रविंद्र पाटील, प्राचार्य एस.एन.खैरनार, योगेश पटेल, रवींद्र पवार, भिका सोलंकी यांनी परिश्रम घेतले.