नंदुरबार l प्रतिनिधी
येथे निर्माण कलामंच नंदुरबार तर्फे ‘नंद कवी रंग’ या अनोख्या कार्यक्रमाने जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्यातील निवडक कवींच्या निवडक कविता सादर करण्यात आल्या.
नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या प्रांगणात खुल्या जागेत गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळाचे निर्माण कलामंच तसेच विश्व हिंद धर्म सेवा संस्था नंदुरबार व बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेच्या वतीने जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून नटराज पूजन व ‘नंद कवी रंग’ या काव्य वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर भावसार व निंबाजीराव बागुल यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले.
यावेळी सुप्रसिद्ध मूर्तिकार मनोज वसईकर, नाट्यदिग्दर्शक रविदा जोशी, ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक रमाकांत पाटील, अभिनेते रणजीत राजपूत, नाट्यकर्मी मनोज सोनार, नागसेन पेंढारकर, राजेश जाधव, प्रा.माधव कदम, दिग्दर्शिका क्षमा वासे-वसईकर, तुषार ठाकरे, कुणाल वसईकर आदि उपस्थित होते. नटराज पूजन झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील कवी वाहरु सोनवणे, स्वर्गीय चामुलाल राठोड, कांतीलाल पाडवी, सारनाथ आगळे, निंबाजीराव बागुल व रमाकांत पाटील या मान्यवरांच्या निवडक कवितांचा ‘नंद कवी रंग’ हा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. सदर कार्यक्रमात नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर, तुषार ठाकरे, राजेश जाधव व धर्मेंद्र भारती यांनी या कवितांचे सादरीकरण त्यांच्या शैलीत केले.
विद्रोही साहित्य संमेलनाची माजी अध्यक्ष वाहरू सोनवणे यांची – गोधड, रमाकांत पाटील यांची – आत्महत्या व सारनाथ आगळे यांची अहिराणी कविता – बिनधास्त चाली आठे… या कवितांचे सादरीकरण नागसेन पेंढारकर यांनी केले. धर्मेंद्र भारती यांनी रमाकांत पाटील यांची – नंदुरबार देशा, सारनाथ आगळे यांची – मजुरसना घाम ना सांगा, कांतीलाल पाडवी यांची – मी स्वतःला विसरलो या कवितांचे सादरीकरण केले. राजेश जाधव यांनी स्वर्गीय चामूलाल राठोड यांची – मी तुमच्या बरोबर येईल पण, कांतीलाल पाडवी यांची – घाम, निंबाजीराव बागुल यांची – दैना या कवितांचं सादरीकरण केले तसेच तुषार ठाकरे यांनी स्वर्गीय चामुलाल राठोड यांची – वाहरू भाऊस…, निंबाजीराव बागुल यांची – शापित गाव या कविता सादर केल्यात.
या कार्यक्रमातील कवितांना उपस्थितांची भरभरून दाद मिळाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत नागसेन पेंढारकर यांनी निर्माण कला मंच नंदुरबार तर्फे प्रत्येक महिन्याला खुला रंगमंचाचा वापर करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले. या कार्यक्रमाचे निवेदन तथा सूत्रसंचालन तुषार ठाकरे यांनी केले. यावेळी एन.टी.पाटील सर, निवेदिता वसईकर, खुशाल राजपूत, विजय पवार, विजय माळवे, कुणाल वीर, रणवीर पेंढारकर, कल्पेश जाधव, गुरु मंडलिक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुषार सांगोरे, जितेंद्र खवळे रोहित हराळे, गौरव पाटील, ऋषिकेश मंडलिक, पांडुभाऊ गवळी, कुणाल अहिरे आदींनी परिश्रम घेतले.