नंदुरबार l प्रतिनिधी
संपूर्ण विश्वात अत्याचार, भ्रष्टाचार, अनाचार, पापाचार, अशांती पसरली असल्याने मानवाने शिव परमात्म्याचे स्मरण करून सत्कार्य करावे.भौतिक सुखांमागे धावताना अध्यात्मा शिवाय पर्याय नसल्याचे प्रबोधनातून सांगण्यात आले.
माउंटआबू (राजस्थान) येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आधुनिक पद्धतीने बनविलेल्या प्रबोधन रथातून नंदुरबार शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणी अध्यात्माचे महत्त्व दाखविण्यात येत आहे. या वाहनातून निद्राधीन कुंभकर्णाचा देखावा लक्षवेधी ठरला.याचबरोबर शिवदर्शनद्वारे सृष्टी वरील प्रकोप आदीबाबत मोठ्या पडद्यावरील चित्रफीत भावस्पर्शी ठरली.
नंदुरबार प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राच्या बीके योगिता दीदी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आजचा मनुष्य कुंभकर्णचे प्रतीक असून गाढ निद्रेत आहे.मानवाला जागृत करण्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय प्रयत्नशील आहे.कार्यक्रमाचे संयोजन ओम शांती परिवार नंदुरबार आणि शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे करण्यात आले.अध्यात्मिक रथाचे दर्शन घेण्यासाठी बालवीर चौक, गवळी वाडा, नवा भोईवाडा,देसाई पुरा, कुंभार गल्ली,शिवाजी रोड,रायसिंग पुरा भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रजापिता ब्रम्हाकुमारी मीडिया विंगचे जिल्हा समन्वयक महादू हिरणवाळे, बीके वर्षा दीदी, बीके दिनेश भाई, सुनील भाई, विष्णू भाई,तसेच कर्नाटक येथील शिवभाई, ईश्वरभाई आदींनी परिश्रम घेतले.
दरम्यान प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयातर्फे नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण भागात प्रबोधन रथाचे मार्गक्रमण सुरू असून दि. 30 एप्रिल पर्यंत अध्यात्मिक प्रबोधन करण्यात येणार आहे.अशी माहिती संयोजकांतर्फे देण्यात आली.