नंदूरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील उमर्दे बु. गावात दारु विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही केल्याच्या रागातून पाच जणांना शिवीगाळ करुन दमदाटी केल्याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील उमर्दे बु.येथील हेमलता पंकज पाडवी यांनी केलेल्या अर्जावरुन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावात दारु विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही केली. याचा राग आल्याने हेमलता पंकज पाडवी, सासरे सुरुपदास फत्तेसिंग पाडवी, पती पंकज सुरुपदास पाडवी, ग्रामपंचायत शिपाई हारु ताराचंद राठोड, उपसरपंच कनीराम मानसिंग राठोड यांना मंजूबाई मगन वळवी, लक्ष्मीबाई मगन वळवी, उषाबाई रमेश वळवी, विनोद रमेश वळवी, दुष्यंत गुलजी प्रधान व वसंत गुलजी प्रधान यांनी शिवीगाळ करीत दमदाटी केली.
तसेच हेमलता पाडवी यांच्यावर मंजूबाई वळवी हिने काठी उगारुन धमकी दिली. याबाबत हेमलता पाडवी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४४, १४६, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक केशव गावित करीत आहेत.