नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील खांडबारा शहरात रासायनिक खतांची भेसळ करून विक्री करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर. कृषी विभागाच्या वतीने सदर कृषी सेवा केंद्रावर कारवाई केली आहे. कारवाई सुरू असल्यामुळे दिवसा दुकान बंद आहे. मात्र सदर दुकान मालकाची मुजोरी एवढी आहे की दिवसा दुकान बंद करून रात्री अंधारात काळाबाजार सुरूच ठेवला आहे. या सगळ्या प्रकाराला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्यामुळे दुकान मालकाची मुजोरी वाढलेली आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून कृषी विभागाचे अधिकारी या प्रकरणाबद्दल माहिती देण्यास नकार देत आहे. परंतु ज्यावेळेस कृषी कार्यालयात माहिती घेण्यास गेले असता सदर कृषी सेवा केंद्रा बाबतच त्या ठिकाणी ही चर्चा सुरू आहे. तसेच थातूरमातूर कारवाई करून रासायनिक खतांचा भेसळ करणाऱ्या रॅकेटला पाठबळ देण्याचे काम कृषी विभागाचे अधिकारी करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
सदर कृषी सेवा मालकाला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर सुनावणीला बोलावलं होतं. सुनावणीत काय कारवाई झाली याबाबत ही अधिकाऱ्यांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे. व माहिती देण्यास स्पष्ट नकार देत आहे.
कृषी विभागाचे अधिकारी कारवाई करतात दिवसा गोडाऊन बंद असतं तरी रात्री राजरोसपणे रासायनिक खतांची भेसळ सुरू असून या सगळ्या रॅकेटमध्ये अधिकारी मल्लीन असल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या आठवड्यात नाशिक विभागीय सहाय्यक कृषी आयुक्त मोहन वाघ नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते. शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्याकडून याआधीच तक्रारी केलेल्या आहेत. या तक्रारी नंतरच विभागीय सहाय्यक कृषी आयुक्तांनी नंदुरबार जिल्हा दौरा केला.
परंतु त्यांच्या या दौऱ्यामध्ये त्यांनी सदर भेसळ करणाऱ्या कृषी सेवा केंद्राबाबत काय कारवाई सुरू आहे. किंवा काय कारवाई केली जाईल याबाबत त्यांनीही कमालीची गुप्तता बाळगली आहे. त्यामुळे रासायनिक खतांची भेसळ करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या अधिकारी व कृषी सेवा केंद्रावर शासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.
असा आहे घोळ
270 रुपयाला असलेली युरिया खताच्या बॅगमधून डीओपी, सुपर फॉस्फेट, दहा दहा 26 असे खतांचे वेगवेगळे प्रकार बनवून 270 रुपयाच्या बॅगेचे पंधराशे ते बाराशे रुपयांमध्ये केली जाते विक्री.
एखाद्या लहान शेतकऱ्याला एकच युरियाची बॅग घ्यायची असेल तर त्याला व्यापाऱ्यांकडून एक बाराशे ते पंधराशे रुपयांच्या महागड्या खतांची बॅग घेण्यासाठी अट ठेवली जाते.
कृषी विभाग भेसळ करणाऱ्या दुकाना वर एका बाजूला कारवाईचे आदेश काढते, तर दुसरीकडे त्याला रात्री खतांचा साठा सप्लाय करून गोडाऊन मध्ये ठेवण्याचा अधिकार देऊन भ्रष्टाचार केला जात असल्याचा प्रकार उघड.
कृषी सेवा केंद्राच्या मालकाची मुजोरी कृषी मंत्र्यांना देखील मी हप्ते देतो अधिकारी कोणीही माझं काही करू शकणार नाही अशा प्रकारची भाषा भेसळ करणारा कृषी सेवा केंद्र मालक सांगतो.दरम्यान शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शेतकरी संघटना करीत आहेत.