नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी निवडणूक क्षेत्रातील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले असून 27 एप्रिल ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत संबंधित कार्यक्षेत्रात ‘कोरडा दिवस’ पाळण्यात येणार आहे.
*मद्यविक्री कधी बंद राहणार?*
निवडणूक प्रक्रियेदरम्यान खालीलप्रमाणे मद्यविक्री बंद राहील:
• मतदानाच्या आदल्या दिवशी (27 एप्रिल 2026): संपूर्ण दिवस बंद.
• मतदानाचा दिवस (28 एप्रिल 2026): मतदानाची प्रक्रिया पार पडेपर्यंत संपूर्ण दिवस बंद.
• मतमोजणीचा दिवस (29 एप्रिल 2026): संपूर्ण दिवस. (मतमोजणी असलेल्या तालुका मुख्यालयी, नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील किरकोळ मद्यविक्री दुकाने मतमोजणी कार्यक्रम संपेपर्यंत बंद राहतील.)
*कडक कारवाईचा इशारा*
ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत, त्या हद्दीतील देशी/विदेशी मद्य विक्री, ताडी दुकाने आणि सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 54 व 56 नुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
मतदान प्रक्रिया मुक्त, न्याय्य आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांना अवैध मद्यविक्रीवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.








