बोरद l प्रतिनिधी
तळोदा येथून बोरद रस्त्याला अवघ्या ६ किलोमीटर अंतरावर असलेले तळवे हे गाव जळगावच्या धर्तीवर केळीसाठी नवा हब ठरू पाहत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,तळोदा तालुका हा सर्वत्र बागायत तालुका म्हणून संपूर्ण जिल्ह्यात परिचित आहे.अशा या तळोदा तालुक्यात तळवे या गावी अनेक मोठमोठाले शेतकरी आपली शेतजमीन कसत आहेत. त्याचबरोबर अनेक प्रकारचे प्रयोग राबवून आपल्या शेतीमधून उत्पन्नाचा स्रोत वाढविण्यासाठी येथील शेतकरी प्रसिद्ध आहेत.
याचेच वैशिष्ट्य म्हणजे तळवे ह्या गावाचा संपूर्ण भौगोलिक विस्तार पहिला तर हे गावं ३६५.५९ हेक्टर एवढ्या क्षेत्रफळात विस्तारलेले आहे. तर शेतीयोग्य जवळजवळ ३५०० हेक्टर शेतजमीन या परिसरात येते. या ३५०० हेक्टर अंतर्गत मोठमोठाल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी असल्याने ते आपल्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण पिक घेण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे.अनेक प्रकारच्या केळीच्या जाती आपल्या शेतात लागवडीसाठी आणल्या जातात त्यामध्ये टिशू रोपांना अधिक महत्व दिले जाते.अर्थात केळीबाबत नाविन्यपूर्ण प्रयोग या ठिकाणी राबविताना शेतकरी दिसून येतात.नवती तसेच कांदेबाग या दोन टप्प्यात उत्पादन घेतले जाते.
केळी उत्पादनाबाबत देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागत असला तरी व्यापारी दृष्टीने जळगांव जिल्हा हा केळीउत्पादनात प्रथम क्रमांकावर येतो.त्याच धर्तीवर तळोदा तालुक्याचा जर विचार केला तर तळवे हे गावं तालुक्यातील सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणारे गाव म्हणून आजच्या घडीला पाहिल्याक्रमांकवर आहे.साधारणतः ५०० ते ७०० हेक्टर जमिनीत हे उत्पादन घेतले जाते. त्याखालोखाल बोरद गावाचा क्रमांक येतो. परंतू व्यापारी दृष्ट्या तळवे परिसरातील केळीला निर्यातीच्या दृष्टीने अधिक महत्व आहे. म्हणून तळवे हे गावं केळीचा हब बनू पाहत आहे.
येथील शेतकरी केळीबाबत विविध ठिकाणी भेटी देऊन उत्पादन वाढीबाबत माहिती घेत असतात व निर्यातक्षम उत्पादन घेण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतात व त्यात ते यशस्वी ही होतात.
उत्तर भारतातील व्यापारी केळी खरेदी करण्यासाठी या गावाला आवर्जून भेट देतात.व गुणवत्तापूर्ण केळीला निर्यातीच्या दृष्टीने योग्य भाव देऊन खरेदीही करतात.गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे उत्पादन चांगले असूनही भाव नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते.मात्र आता परिस्थिती सुधारली आहे.शेतकरी जोमाने केळीचे उत्पादन घेत आहेत.