नंदुरबार येथील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व नंदुरबार जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय खो-खो निवड चाचणी गटवारी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक यशवर्धन रघुवंशी यांच्या हस्ते हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन व मैदानावर नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी पाटील, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव प्रा.राजेंद्र सोनवणे, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा.मनोज परदेशी, क्रीडा शिक्षक प्रा.डॉ.मयुर ठाकरे, खो-खोचे पंच अनिल रौंदळ, करण चव्हाण, वसंत गावित, विशाल सोनवणे, दादाजी कोंडदेव पुरस्काराने सन्मानित बोराडे सर, गंगाधर मोराळे, दीपक सपकाळ, कैलास पटणे, उदय पंड्या आदी उपस्थित होते. या गटवारी स्पर्धेत मुलींच्या गटात सातारा नाशिक व नंदुरबार या तीन संघांचे सामने मैदानावर घेण्यात आले. यात नाशिक संघाने विजय पटकाविला. सातारा संघ द्वितीय स्थानी राहिला. विजयी संघांचे मान्यवरांनी अभिनंदन केले. या स्पर्धेत विजयी संघ शेगाव येथे होणार्या पुढील स्पर्धेत खेळणार आहे.