नंदुरबार l प्रतिनिधी
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शाळा आणि अंगणवाड्यांना नळाने पाणी देण्यासाठी आवश्यक कामे प्राधान्याने पूर्ण करा असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जल जीवन मिशनबाबत आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, कार्यकारी अभियंता पी.आर.गरेवार, शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी आदी उपस्थित होते.
श्रीमती खत्री यांनी जिल्ह्यातील अ, ब आणि क वर्गात येणाऱ्या गावातील पाणी योजनांचा आढावा घेतला. नळ पाणी पुरवठा योजनेसाठी आवश्यक शाश्वत स्त्रोताचा शोध घेण्यात यावा आणि काही ठिकाणी पाणी अडवून स्त्रोत उपलब्ध करावा. प्रायोगिक तत्वावर काही गावांना मिळून एकच योजना राबविण्याबाबत शक्यतेचाही विचार करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.
मिशन अंतर्गत अस्तित्वात असलेल्या योजनेत किरकोळ स्वरुपाची कामे असल्यास अशी गावे किंवा वस्त्या अ गटात, योजनेत अधिक दुरुस्ती किंवा बदल आवश्यक असलेल्या वस्त्या ब गटात आणि कोणतीही योजना नसलेली गावे किंवा वस्त्या क गटात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. अ गटातील 54, ब गटातील 588 आणि क गटातील 302 गावे अशा एकूण 944 गावातील 2952 वस्त्यांसाठी एकूण 1658 कोटी 34 लक्ष रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनांचा आराखड्यात समावेश करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.