नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील बोरवान, टाकली, घोडमाग गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर पूल नसल्याने नागरिकांना नदीतून पुराच्या पाण्यात जीवघेणा प्रवास करावा लागतो.
तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम भागातील बोरवन, टाकली, घोडमाग, हातबारी, केलीपाणी, अक्राणी, विहिरमाळ गावांना जोडणाऱ्या रस्त्याला नदीवर पूल नसल्याने नागरिकांना नदीतून पुराच्या पाण्यात जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. एक दुचाकीस्वार नदीच्या प्रवाहातून वाट काढत असल्याचे धोकादायक चित्र आहे.
सदर गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे पहिल्याच पावसात रस्ता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेला आहे, अद्यापही या परिसरात डांबरीकरण रस्ते झालेले नाही. नागरिकांनी स्वतः माती टाकून कच्चे रस्ते तयार केले आहे.
पावसाळ्यात या गावातील नागरिकांना रहदारीसाठी मोठी अडचण निर्माण होते. आजारी माणसे व गरोदर मातांना आजही बांबूच्या झोळीतून दवाखान्यापर्यंत पोहचवावे लागते या गावाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी शासन प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे.
पहिल्याच पावसात नदीला पूर आला होता त्यादरम्यान एक पिकप वाहन व दुचाकी वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले होते. शासन व लोकप्रतिनिधी सदर गावातील नागरिकांच्या समस्या कडे कधी लक्ष देतील असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.