तळोदा | प्रतिनिधी
तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शाळेत येणासाठी चला मुलांनो शाळेत चला अशी मोहिम राबवा. यासोबतच शाळा सुरू करण्यासाठी आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय अनुदानित एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल असलेल्या ग्रामपंचायतींना विशेष ग्रामसभा घेऊन ठराव देण्याच्या सूचना प्रकल्प अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी दिल्या आहेत.
दि. २६ जुलै २०२१ च्या शासन निर्णयानुसार इयता ८ वी ते १२ पावेतो शाळा सुरू करणेबाबत नियोजन व सूचना देणे संदर्भात तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या सभागृहात प्रकल्पस्तरीय शाळा व्यवस्थापन समितीची बैठक उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ.मैनक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीत सहायक प्रकल्प अधिकारी सुवर्णा सोलंकी, मुख्याध्यापक सी.एम.पाटील, ग्रामसेवक आर.ए.पावरा, सलसाडी मुख्याध्यापक के.एस.पाटील, राणीपूर सरपंच सुशीला वळवी, सलसाडी सरपंच विद्या ठाकरे, लोभानी ग्रामसेवक पी.डी.खाडे, सहायक प्रकल्प अधिकारी शिक्षण एस.एम.चौधरी, के.सी.कोकणी, शिक्षण विस्तार अधिकारी बी.एम.कदम, बी.आर.मुंगळे, हापसिंग मोरे आदीसह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, अनुदानित व शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक, ग्रामसेवक, सरपंच आदी उपस्थित होते.
या बैठकीत ग्रामसेवक व सरपंच यांना गावातील विद्यार्थ्याना कोरोनाचे नियम पालन करून इयता ८ वी १२ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत नियमित येण्यासाठी आवाहन करावे, शिक्षण सेतू अंतर्गत शिकविण्यासाठी येणाऱ्या शिक्षकांना सहकार्य करणे, विद्यार्थ्यांना कोरोना बाबत मार्गदर्शन व जनजागृती करणे पालकांना समुपदेशन करून विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत आवाहन करणे, शाळा सुरू करणेपूर्वी विद्यार्थ्यांनी शाळेत यावे यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने चला मुलांनो शाळेत चला अशी मोहिम राबविण्याच्या सूचना प्रकल्प अधिकारी डॉ.घोष यांनी दिल्या. गावात दवंडी पिटवून आश्रमशाळा सुरु झाल्याबाबत पालक व विद्यार्थी यांना माहिती द्यावी, शाळा सुरू करणे संदर्भात विशेष ग्रामसभा आयोजित करून ठराव देण्यासाठी सहकार्य करावे, यासोबतच २ ऑगस्ट पासून स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जनजागृती कार्यक्रमात ग्रामपंचायत समिती व ग्रामसेवक यांनी मुख्याध्यापक व शाळेत सहकार्य करावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पालक यांच्या जनजागृती करणे. आश्रमशाळांना ग्रामपंचायतीने विशेष मदत करावी असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले. यासोबतच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला, रहिवासी दाखला आदी देण्याबाबत कार्यवाही करण्याचे ग्रामसेवक, तलाठी, मुख्याध्यापक यांनी समन्वय साधून सहकार्य करावे अशा सूचना घोष यांनी दिल्या तर बैठकीत कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने आवश्यक पूर्व तयारी करणेबाबत देखील चर्चा करण्यात आली.