नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार शहरात मोकाट गुरांनी हैदोस घातला आहे .नंदुरबार नगरपालिकेने आता मोकाट गुरे पकडण्याची मोहिम हाती घेतली आहे . शुक्रवार दि.७ ऑगस्ट रोजी शहरात १८ गुरे पकडण्यात आली असून संबधीत गुरे मालकांनी आपली गुरे गोठ्यात बांधली नाहीत किंवा शहराबाहेर सोडली नाहीत तर दंड आकारणी केली जाईल असा इशारा मुख्याधिकारी यांनी दिला आहे .
नंदुरबारात मोकाट गुरांचा त्रास वाढला आहे . भर रस्त्यावर , बाजारात , वसाहतींमध्ये या गुरांचा हैदोस मुळे अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे . रस्त्यावर अचानक आलेल्या गुरांमुळे अनेकांचे अपघात झाले आहेत . दोन दिवसांपूर्वी मंगळ बाजारातील अमृत चौकात गुरांच्या झुंजमुळे अनेक विक्रेत्यांचे नुकसान झाले , वाहनांचेही नुकसान झाले . सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही . याबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता पालिकेने गुरेपकडण्याची मोहित हाती घेतली आहे . शुक्रवार दि.७ ऑगस्ट रोजी पहिल्या दिवशी १८ गुरे पकडण्यात येऊन कोंडवाड्यात टाकण्यात आली आहेत . यापुढे दररोज ही मोहिम राबविण्यात येणार आहे . त्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत . गुरे मालकांनी आपली गुरे गोठ्यात बांधून ठेवली नाहीत किंवा भाकड गुरे पांझरापोळमध्ये नेली नाहीत तर अशा गुरे मालकांना दंडाची अकारणी केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली . दरम्यान , पालिकेने गेल्या वर्षी गुरे पकडण्याची मोहिम राबविली होती . पकडलेली गुरे कोंडवाड्यात टाकण्यात आली . परंतू गुरे मालकांनी दमदाटीने गुरे तेथून काढून नेली . दंडाचा भरणा तर लांबच राहिला होता . आता तसे होऊ नये यासाठी पालिकेने कडक उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे .