नंदुरबार | प्रतिनिधी
नगरपालिका अंतर्गत शहरातील टिळक रस्त्यावरील प्राथमिक शाळा क्रमांक १० आणि सिंधी कॉलनीतील प्राथमिक शाळा क्रमांक १३ या जागेवर बांधा वापरा व हस्तांतरित करा अर्थात बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल बांधणे या कामाला नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. दरम्यान ऑफलाइन सभेचे ऐवजी ऑनलाईन सभा झाल्यामुळे चर्चेला वाव मिळाला नाही.यासह विविध मागण्यांसाठी भाजपाच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला.
नंदुरबार येथे पालिकेतर्फे आयोजित केलेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ.रत्ना चंद्रकांत रघुवंशी होत्या. यावेळी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले तसेच एकूण १४ विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या सभेला उपनगराध्यक्ष रवींद्र पवार, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, संजय माळी, दीपक पाटील, मोतीलाल मराठी उपस्थित होते. रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत झराळी येथील दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रासाठी सन २०२१ -२२ या वित्तीय वर्षासाठी लागणारे ब्लिचिंग पावडर, तुरटी, गॅस, टँकर खरेदी करणे, शहराच्या मंजूर विकास योजनेतील नगरपरिषद मालकीचे सिटी सर्वे नंबर १० ९९ चे क्षेत्र ३५१ पॉईंट दोन चौरस सेंटीमीटर या प्राथमिक शाळा असलेल्या विद्यमान वापर वरून वाणिज्य प्रयोजनासाठी करणे बाबत विचार विनिमय करण्यात आला. सन २०२१- २०२२ या वित्तीय वर्षासाठी पाणीपुरवठा उपयोग पाईपलाईन दुरुस्ती करणे व पाणीपुरवठा विभागाकडील इतर कामे करणे कामी मटेरियल, मजुरी सर्व कामे करण्यासाठी अभिकर्ता नियुक्त करणे व त्या कामी येणार्या आदमासे खर्चास मान्यता देण्यात आली. नंदुरबार शहराच्या मंजूर विकास योजनेतील सर्वे नंबर ६४३ / १ चे क्षेत्र शेती विभागातून रहिवास विभागात समाविष्ट करणे बाबत आलेल्या विनंती अर्जावर चर्चा करण्यात आली. नगर परिषदेच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात जमा आणि खर्चाचा हिशोब मंजूर करण्यात आला. सन २०२१- २०२२ या वर्षाकरिता पाणीपुरवठा विभागाकडील इलेक्ट्रीक मोटारी, सबमर्सिबल पंप, रिवाइंडिंग करणे, दुरुस्ती करणे ,कामी वार्षिक दर मागणी व अदमासे खर्चास मंजुरी देण्यात आली. नंदुरबार शहराच्या मंजूर विकास योजनेतील सर्वे नंबर ८४ क्षेत्र शेती विभागातून रहिवास विभागात समावेश करणेबाबत आलेल्या विनंती अर्ज विचार करण्यात आला. नगरपालिकेच्या शाळा क्रमांक १० आणि १३ या ठिकाणी बीओटी तत्वावर व्यापारी संकुल उभारणे बाबत मंजुरी देण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण मापदंडानुसार शहरात विविध ठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालय तीन वर्षासाठी देखभाल-दुरुस्ती करिता देण्यासाठी दर मागवणे बाबत चर्चा करण्यात आली. शहरातील पाताळगंगा नदीलगत नगरपालिकेच्या मालकीच्या धोबी घाट व कंपाउंड वॉल भाडेकराराने मिळणेबाबत आलेल्या विनंती अर्जावर चर्चा करण्यात आली. वित्तीय वर्षाकरिता नागरी आदिवासी वस्ती सुधार योजने अंतर्गत विविध विकास कामे करण्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी व निधी मागणीकरिता शासनास सादर करणे बाबत चर्चा करण्यात आली. नंदुरबार शहराच्या मंजूर विकास योजनेतील सर्वे नंबर ४०५ चे क्षेत्र सार्वजनिक सार्वजनिक विभागातून वरून रहिवास विभागात समाविष्ट करणे बाबत आलेल्या अर्जावर विचार विनिमय करण्यात आला. दि. २७ मार्च २००० पूर्व नगर परिषद सेवेत विशेष बाब म्हणून संभाषण झाले व मान्यता मिळालेले मयत कर्मचार्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणे बाबत सादर केलेल्या अर्जावर विचार विनिमय करण्यात आला. तसेच मोटार वाहन विभागातील चालक एलिस दादाभाऊ यांचे कायमस्वरूपी बंद केलेली एक वेतनवाढ सुरू करणे बाबत दिलेल्या विनंती अर्जावर विचार विनिमय करण्यात आला. अवघ्या दहा मिनिटात चौदा विषयांना मंजुरी देण्यात आली. शासनाच्या सूचनेनुसार ऑनलाइन सभा असल्यामुळे मोजके नगरसेवक यात सहभागी झाले होते. दरम्यान भारतीय जनता पार्टी आणि विरोधी पक्षातर्फे रविवारच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकण्यात आला होता.