नंदुरबार l प्रतिनिधी –
भारतीय संस्कृती विविध परंपरांनी नटलेली आहे. तिचा अभिमान प्रत्येक भारतीयाला असायलाच हवा. याच संस्कृतीच्या जोरावर जगभरात भारतीयांचा सन्मान होतो. मात्र आपली संस्कृती विसरुन पाश्चात्य संस्कृतीचा आहारी जात आहोत, अशी खंत व्यक्त करुन प्रत्येक भारतीयाने आपली भारतीय संस्कृतीचा जीवनात अंमल करणे गरजेचे असल्याचे मत प.पु. पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी व्यक्त केली.

येथील नंददर्शन (चित्ते) परिवाराच्यावतीने स्व.जुलालसिंग बाजीराव राजपूत (जिभाऊ) व स्व.उषादेवी जुलालसिंग राजपूत यांच्या स्मरणार्थ आयोजित श्रीमद् भागवत कथा सप्ताहात काल चौथ्या दिवशी प.पु. भगरे गुरुजी यांनी स्वायंभूव मनु, सतीचरित्र, धृवचरित्र, प्रियव्रत चरित्र, भरतचरित्र, अजामिळ उध्दार प्रल्हाद अवतार, नरसिंह अवतार यावर आपल्या मधुरवाणीने भागवत कथेचे निरुपण केले. भारतीय संस्कृती धृ्रवासारखे चरित्र होवुन गेले आहे. देवर्षी नारदाने गुरुमंत्र दिल्यानंतर धृ्रव बाळाने इतिहास घडविला. कोणाकडुनही अपमान झाल्यास त्याचे वाईट वाटुन घेवु नका. अपमान हा आपल्या चांगल्यासाठी असतो. आपमान न मानता त्यातुन शिकुन आपल्या व्यक्तीमत्वात बदल घडुन आणु शकतो, असाच संदेश धृ्रव बाळाच्या चारित्र्यातुन मिळतो. कोणाचे मन दुखेल असे कधीही बोलु नका. आपले आयुष्य सखोल व्हावे, असाच प्रत्येकाचा प्रयत्न असतो. मृत्यू नंतरच्या आत्म्याचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी अन्नदान, वस्त्रदान व औषधी दान हे विचार न करता करायला हवे. स्वभावातील कोपिस्टपणा, कटु वाणी, दरिद्रता व परिवार अथवा समाजात वैर निर्माण करणार्यांचा सन्मान कधीही होत नाही. प्रत्येकाने आपल्या लक्ष्मण रेषेत राहुन कार्य केले तर प्रत्येकाचे जीवन सफल होणार आहे. यावेळी भगरे गुरुजी यांनी आईचा महिमा सांगुन अनेकांना भावनिक केले. यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय यासह विविध भजनांच्या तालावर अबाल वृध्दांनी ठेका धरला.









