तळोदा l प्रतिनिधी
अवघ्या देशात घडणाऱ्या घडामोडींमध्ये आदिवासींचे हक्क, संस्कृती यासह मुळनिवासींशी संबंधित अनेक घडामोडींचाही समावेश आहे. या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मोदलपाडा ता. तळोदा येथे दि. २८ नोव्हेंबर रोजी आदिवासी एकता परिषदेची राष्ट्रीयस्तर चिंतनसभा आयोजित करण्यात आली आहे.

युनोकडून प्राप्त व कायदेशीर हक्क, आदिवासींचा गौरवशाली इतिहास, वेगळा ठसा उमटवणारा सांस्कृतिक वारसा यासह अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी ही चिंतनसभा होत आहे. या सभेत माजी मंत्री पद्माकर वळवी, डॉ. दिलवरसिंग वसावे, ज्येष्ठ साहित्यिक वाहरु सोनवणे, जि.प.चे गटनेते सी.के.पाडवी, जि.प.सदस्य सुहास नाईक यांच्यासह देशभरातील विचारवंत उपस्थित राहणार आहेत. याच सभेत जानेवारीमध्ये होणाऱ्या महासंमेलनाची पुर्वतयारी देखील करण्यात येणार आहे. त्यात देशभरातून निघणाऱ्या रैलीचे मार्ग व नियोजन, संमेलनाचे नियोजन, निधी संकलन यावरही चर्चा करण्यात येणार आहे. शिवाय परिषदेची विविध कार्यकारिणी देखील गठीत करण्यात येणार आहे. या सभेला समस्त आदिवासी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन एकता परिषदेचे जिल्हा सचिव ॲड. अभिजीत वसावे, करमसिंग पाडवी, प्रा.भिमसिंग वळवी यांनी केले आहे.









