नंदुरबार l प्रतिनिधी-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या बारामती येथे झालेल्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाची बातमी ऐकून मन अक्षरशः सुन्न झाले आहे. हा धक्का इतका मोठा आहे की क्षणभर वास्तव स्वीकारण्याची ताकदच उरलेली नाही. अजूनही ही बातमी खरी आहे, यावर विश्वास बसत नाही.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा ध्यास घेतलेले, विकासाला दिशा देणारे आणि निर्णयक्षम लोकनेते म्हणून अजितदादांचे कार्य इतिहासात कायम स्मरणात राहील. राज्याच्या हितासाठी ते नेहमी एक पाऊल पुढे असत. प्रशासनावरची त्यांची मजबूत पकड, कामातील विलक्षण वेग आणि लोककल्याणासाठीची अथक तळमळ — यामुळेच त्यांनी जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
त्यांचा प्रशासनातील अनुभव अफाट होता, अजितदादांचे जाणे म्हणजे केवळ एका नेत्याचा अंत नाही, तर महाराष्ट्रावर कोसळलेला एक प्रचंड आघात आहे. देशाने एक दूरदृष्टीसंपन्न नेतृत्व गमावले आहे, अजितदादा आता आपल्यात नाहीत, ही जाणीव मन अजूनही स्वीकारू शकत नाही.
या दुर्दैवी अपघातात अजितदादांसह ज्यांनी आपले प्राण गमावले, त्या सर्वांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबीयांच्या,आप्तस्वकीयांच्या आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे.
विजय चौधरी, महामंत्री भाजपा








