नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसेनेचे नेते, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व पालिकेच्या नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराचा केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. कोरोना संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन रघुवंशी दाम्पत्यांनी केले आहे.
माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर गेल्या दोन वर्षांपूर्वी चेन्नई येथे यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यकृत प्रत्यारोपनानंतर लस घेणे धोकादायक ठरू शकत होते. गेल्या आठवड्यात चंद्रकांत रघुवंशी यांनी चेन्नई येथील डॉक्टरांशी सल्लामसलत केली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज शनिवारी शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या केंद्रावर कोव्हीशिल्ड लस घेतली.
नंदनगरीतील जनतेच्या आशीर्वादामुळेच राजकारणात यशस्वी झालो आहोत.जोपर्यंत नंदुरबारकर नागरिकांचे लसीकरण होत नाही तोपर्यंत आपण स्वतः लस टोचून घेणार नाहीत असा निर्धार नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी केला होता. शहरात आजपर्यंत जवळपास निम्म्यापेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले झाल्याने नगराध्यक्षांनी आज शनिवारी कोव्हीशील्ड लस टोचून घेतली. याप्रसंगी जि.प सदस्य ॲड. राम रघुवंशी, सौ.मेघा रघुवंशी,नगरसेवक कुणाल वसावे, कार्यकर्ते मोहितसिंह राजपूत उपस्थित होते.