तळोदा | प्रतिनिधी
तळोदा येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तळोदा आणि ४९ महाराष्ट्र बटालियन अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवशीय वार्षिक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिराला उद्घाटक म्हणून सुधीरकुमार गिरधर माळी उपाध्यक्ष,अध्यापक शिक्षण मंडळद्वारा संचलित कला, वाणिज्य ट्रस्ट तळोदा हे उपस्थित होते. या उद्घाटन प्रसंगी सुधीरकुमार माळी यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे महत्व विशद केले. त्यात मला विविध प्रकारच्या सामाजिक व राष्ट्रीय पैलूची माहिती मिळाली व स्वयंम शिस्त ही संकल्पना लक्षात आली. ते म्हणाले कि, आपण येणाऱ्या सात दिवसामध्ये बौद्धिक आणि मैदानी सत्रातील सर्व उपक्रमात सहभागी व्हा, शिस्त बाळगा , देशसेवा करण्याकड़े व व्यक्तिमत्व घडविण्याकडे लक्ष द्या असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यालयीन अधिक्षक योगेश्वर पंजराळे हे होते. वार्षिक प्रशिक्षण शिबिर यशस्वीतेसाठी कला व वाणिज्य ट्रस्टचे अध्यक्ष भरतभाई माळी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.मगरे यांनी शुभेच्छा दिल्यात. या सात दिवस चालणाऱ्या या शिबिरात एनसीसी कॅडेटसाठी बौध्दिक आणि प्रात्यक्षिक सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ४९ महाराष्ट्र बटालियन अमळनेरचे प्रशिक्षक सुभेदार विनोद कुमार, हवालदार संजय कुमार व हवालदार नाना पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख प्रा.राजु यशोद यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.गौतम मोरे यांनी केले. तर इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.मुकेश जावरे यांनी आभार प्रदर्शन केले. या शिबिरात सी प्रमाणपत्र परीक्षा देणारे ११ आणि बी प्रमाणपत्र परीक्षेस पात्र असलेल्या २२ अशा ३३ कैडेट्स शिबिरात सहभागी आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस.यु.ओ.गजानन चिंतेवाड, जे.यु.ओ.परिश्रम घेत आहेत.