नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत निर्यातदारांचे संमेलन आज येथे पार पडले.
नंदुरबार शहरातील एनबीसी मॉल येथे हे संमेलन झाले. जिल्हाधिकारी मनीषा खत्री अध्यक्षस्थानी होत्या. उद्योग अधिकारी दिलीप पाटील, वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे एफटीडीओ प्रमोद थावरे, देवा नंद, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील तंत्र अधिकारी वसंत चौधरी आदी उपस्थित होते.
या संमेलनात जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजकांना निर्यातवाढीसाठी निर्यातक्षम उत्पादने व सेवा तसेच उत्पादनाशी संबंधित निर्यातीच्या संधी व निर्यातक्षम उत्पादन प्रक्रिया, सेवा, सुविधांबाबत माहिती घेत जिल्ह्यातील उद्योजक व निर्यातदारांशी चर्चा करुन उद्योगांबाबत येणाऱ्या अडी- अडचणी जाणून घेतल्या.
श्री. चौधरी यांनी आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत असंघटित क्षेत्रातील अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी केंद्र सरकार सहाय्यीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगा विषयी माहिती दिली.
प्रास्ताविकात बोलताना श्री. पाटील यांनी सांगितले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाच्या वतीने 20 ते 26 सप्टेंबर या काळात वाणिज्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ज्यामध्ये आत्मनिर्भर भारत हा केंद्रस्थानी असून प्रत्येक जिल्ह्याला निर्यात केंद्र बनविण्यात येणार असल्याचे माहिती त्यांनी दिली.
यावेळी श्री. थावरे,श्री.देवा नंद, श्री. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. या संमेलनास जिल्ह्यातील विविध उद्योजक, शेतकरी गटाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.