नंदुरबार l प्रतिनिधी
सातपुड्यात गेल्या पंधरवड्यात झालेल्या अवकाळी पावसात आंबा, महू, चारोळीचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे कोकण व विदर्भातील शेतकऱ्यांप्रमाणे सातपुड्यातील शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते रतन पाडवी यांनी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्याकडे केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात 2 मार्च ते 23 मार्च पर्यंत अवकाळी पावसामुळे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. फेब्रुवारी व मार्च या महिन्यात आंबा, महु व चारोळी या झाडांना मोहर आलेला असतो व इतर हंगामी शेतकरी यांचे मका, हरभरा, गहू, अगर, टरबूज, अंगर या प्रकारचे शेती करतात तरी ऐन वेळी अवकाळी पावसामुळे सर्व झाडावरील मोहर गडून पडल्याने व हंगामी शेती करणारे शेतकरी यांचे उपजीविकेचे व उत्पन्नाचे साधन राहिले नाही.
ज्या प्रकारे कोकणातील विदर्भातील व मराठवाड्यातील शेतकरी यांना अवकाळी पावसामुळे जे नुकसान भरपाई देण्यात येतो त्याच प्रकारे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाह व उत्पनांचे साधन आहे. आंबा, महु व चारोळी या झाडांवर अवलंबून असून तसेच हंगामी शेतकऱ्यांचे शेतीवर उदरनिर्वाह असून उत्पन्नाचे साधन राहिले नाही व कुठलाही रोजगार उपलब्ध नाही तरी तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची तरतूद करावी अशी मागणी या निवेदनात रतन पाडवी यांनी केली आहे.यावेळी केलजी पाडवी आदी उपस्थित होते.








