नंदुरबार | प्रतिनिधी
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय आवारातील लॉन टेनीस मैदानाचे नुतनीकरण व सरसेनापती संताजी असे नामकरण केलेल्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
त्यावेळी त्यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील व इतर अधिकारी यांचे समवेत लॉन टेनीस खेळाचा आनंद लुटला.
सरसेनापती संताजी हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक शौर्य गाजवलेले योध्दा असून त्यांनी काही काळ नंदुरबार जिल्ह्यात वास्तव्य केल्याचे दाखले इतिहासात आढळून येतात. त्यांनी आपल्या पराक्रमाने मुघल सत्तेला नामोहरण केल्याचे इतिहासातील साहित्यात नमुद आहे. त्यांच्या पराक्रमाचा उजाळा म्हणून २००७ साली तयार केलेल्या लॉन टेनीस मैदानाचे नुतनीकरण करुन त्यास सरसेनापती संताजी टेनीस मैदान असे नाव दिल्याचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी सांगितले की, खेळ हे मानवी जिवनासाठी अत्यंत महत्वाचे आहे खेळामुळे वेळेचे बंधन, धैर्य, शिस्त, गटामध्ये काम करण्याची वृत्ती, आत्मविश्वास या गुणांची वृध्दी होते. पोलीस दलात काम करीत असतांना सततचे बंदोबस्त, कामाचा ताण यामुळे शारीरिक स्वास्थ्याकडे पोलीसांचे कायमच दुर्लक्ष होते. सततच्या या कामाच्या व्यापातून बाहेर पडून पोलीस दलात काम करणार्या पोलीस अधिकारी व अमलदार यांना आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष दिले पाहिजे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ हे एक महत्वाचे साधन आहे असे सांगितले. दररोज शक्य नसले तरी आठवड्यातून शक्य असेल तेवढ्या वेळा ते स्वत: लॉन टेनीस खेळत असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले.याप्रसंगी पोलीस मुख्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, शहादा उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस उप अधीक्षक विश्वास वळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी उपस्थित होते.