सारंगखेडा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त सुरु असलेल्या चेतक फेस्टिव्हलमध्ये अश्व मैदानावरील ट्रॅकवर अश्व शर्यती घेण्यात आल्या . त्यात व्यापारी वर्ग व शेतकरी वर्ग अशा दोन गटात स्पर्धा झाल्या . त्यात ३६ घोड्यांचा सहभाग होता . शेतकरी गटातून प्रथम क्रमांक बाबुलाल अश्व , तर व्यापारी गटातून मलंग याने प्रथम क्रमांक पटकावला या शर्यती पाहून हजारो अश्वशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले .

चेतक फेस्टिव्हल अंतर्गत आज घोडयाच्या धावण्याची स्पर्धा झाली . यात एकूण ३६ घोडयांचा सहभाग होता .सहा राऊंडमध्ये पाच . पाच घोडयांना तीन राऊंड नुसार दौडविण्यात आले . त्यातून एक . एक असे अंतिम राऊंडमध्ये पाच मधून तीन विजेते काढून त्यांना गौरविण्यात आले . अत्यंत चित्तथरारक दौड पाचही राऊंडमध्ये झाली . घोडयांची दौड पाहून उपस्थित अश्वप्रेमीच्या डोळ्याचे पारणे फिटले . मुंबई , दिल्लीच्या धर्तीवर ही स्पर्धा झाली . शेतकरी गटातून झालेल्या शर्यतीत प्रथम क्रमाक प्रताप पाटील यांचा बाबुलाल , द्वितीय विजय भोसले यांचा बारूद तर तृतीय विक्की पाटील यांचा व्हायरस तर व्यापारी गटातून प्रथम क्रमांक गौस खान उत्तर प्रदेश यांचा मलंग , द्वितीय मोरबी ( गुजरात ) येथील किशोर भाई यांची उडान तर तृतीय बरेली ( उत्तर प्रदेश ) येथील बिजली यांचा सन्मान करण्यात आला .
विजेत्यांचा जल्लोष
विजेत्या अश्वमालकांनी स्पर्धा जिंकल्यानंतर आपल्या घोड्यांवर पाचशे रुपयांचा नोटा उडवित विजयाचा आनंद साजरा केला .ढोल . ताशांच्या गजरासह नृत्य करीत गुलालाची उधळण केली .विजयानंतर प्रथम , द्वितिय व तृतीय आलेल्या अश्वमालकांनी सुमारे तासभर तल्लीन होऊ नाचत आनंदोत्सव साजरा केला .विजेत्या स्पर्धकांना चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते गौरविण्यात आले .आरिफ शहा व पुरुषोत्तम आगळे यांनी कार्यक्रमाचे प्रसारण केले . यावेळी सरपंच पृथ्वीराजसिंह रावल , दिग्वीजयसिंह रावल , प्रणवराजसिंह रावल , गोवर्धन पाटील , शरद शिरसाठ , गणेश कुवर आदी उपस्थित होते .








