नंदुरबार-
पोलीस भरती प्रक्रिया-२०२२ मधील उमेदवाराला कोणत्याही एका जिल्ह्यासाठी अर्ज भरण्याच्या अटी शिथिल करण्यात यावी. याप्रकरणी गृह विभागाने गांभीर्याने विचार करुन तात्काळ निर्णय घेवून पोलीस भरतीसाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आम आदमी शेतकरी संघटनेकडून भरती प्रक्रिया सुधारणासाठी महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आम आदमी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बिपीन चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तसे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कार्यालयास ई-मेलद्वारे पाठविण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच वर्षापासून पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्यात कोरोना महामारी असो किंवा शासनाच्या उदासिन धोरणामुळे पोलीस उशिरा का होईना पण राज्य शासनाने सुरु केल्या. परंतू त्यातही आता पोलीस भरती राबविताना कुठल्याही एकाच जिल्ह्यात भरतीसाठी अर्ज करता येईल, या अटीमुळे ग्रामीण भागातील वर्षानुवर्षे मेहनत करणार्या व पोलीस होण्याचे स्वप्न बाळणार्या उमेदवारांवर एकप्रकारे राज्य शासनाने अन्याय केला असून ग्रामीण भागातील बहुतांश तरुण हा अल्पभूधारक किंवा भूमीहीन शेतकर्यांचा पोरगा असून एकाच जिल्ह्याची अट राज्य शासनाने घालून दिली असून ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर एकप्रकारे अन्याय केला आहे,
अशी मानसिकता आज पोलीस भरतीसाठी मेहनत करणार्या महाराष्ट्रातील तरुणांची झाली असून राज्यात पोलीस शिपाई पदाचा १८ हजार जागांसाठी ही प्रक्रिया सुरु असून त्यातील बहुतांश जागा मोठ्या शहरांसाठी भरल्या जाणार आहेत. त्यामुळे परिक्षार्थींमध्यणे संंभ्रमावस्था निर्माण होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील पोलीस भरतीसाठी तयार होणार्या तरुणांची ईच्छेनुसार पोलीस भरती प्रक्रिया ही जुन्या परीक्षा पद्धतीने म्हणजेच जिल्हा पोलीस किंवा आयुक्तालयासाठी एकापेक्षा अधिक अर्ज करण्याची मुभा राज्य शासनाने द्यावी.
पोलीस भरती प्रक्रियेत लागणारे शुल्क जर परिक्षार्थी भरण्यास तयार आहेत, तर राज्य शासनाने परिक्षार्थ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार का करु नये? भरती एकाच जिल्ह्यात एका चुकीने संधी हुकली तर उमेदवाराला दुसर्या जिल्ह्यात प्रयत्न करता येतो. एका जिल्ह्यात अपयश आले तर त्या विद्यार्थ्याला दुसर्या भरती प्रक्रियेची वाट पहावी लागेल. या काळात वयाची मर्यादा ओलांडली तर उमेदवाराच्या आयुष्याचे कायमचे नुकसान होईल. त्यामुळे मा.मंत्री महोदयांनी भरती प्रक्रियेतील एका जिल्ह्याची अट शिथिल करुन उमेदवारांना जुन्या भरती प्रक्रियेप्रमाणे इतर जिल्ह्यातही अर्ज सादर करण्यासाठी मुभा द्यावी.
तसेच भरती प्रक्रियेत बँण्ड पथकाच्या भरती प्रक्रियेचाही समावेश करुन इतर तरुणांनाही संधी द्यावी. वरील विषयावर गृह विभागाने गांभीर्याने विचार करुन तात्काळ निर्णय घेवून पोलीस भरतीसाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आम आदमी शेतकरी संघटनेकडून भरती प्रक्रिया सुधारणासाठी महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे आम आदमी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बिपीन पाटील यांनी दिला आहे.








