धडगाव तालुक्यातील खुंटामोडी गावाच्यापुढे दाबपाणीपाडा येथून देशी – विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा ताबा सुटल्याने वाहन उलटून अपघात घडला . याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , अक्कलकुवा तालुक्यातील जांगठी येथील किरण सिंगा वसावे हा त्याच्या ताब्यातील वाहन ( क्र.एम. एच .४८ एके ८६४४ ) यातून मद्याची वाहतूक करत होता . मोलगी रस्त्यावरील खुंटामोडी गावाच्यापुढे दाबपाणीपाडा येथून जात असतांना त्याचा वाहनावरील ताबा सुटला . यामुळे वाहन उलटून अपघात घडला . अपघात घडल्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला . घटनास्थळी वाहनाची तपासणी केली असता त्यात ८६ हजार ४०० रुपये दारुच्या बाटल्या तसेच २५ हजार ८० रुपये किंमतीच्या २६४ बियरच्या बाटल्या असा सुमारे १ लाख ११ हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे . चालकाचा शोध घेतला असता रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तो घटनास्थळावरुन पसार झाला . याबाबत पोना.साहेबराव गावित यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम २७ ९ , ४२७ , महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ( ई ) , १०८ , मोटार वाहन कायदा कलम १८४ , १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोना.स्वप्निल गोसावी करीत आहेत .