नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील वळण रस्त्यावर नेहमी अपघात होत असल्याने या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात करण्यात यावे त्याचप्रमाणे कोळदा ते खेतिया राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी ते कोळदा पर्यंतच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा सौ.रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी रस्ते वाहतूक व महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे केली होती. यावेळी गडकरी यांनी रघुवंशी यांच्या दोन्ही प्रस्तावाला तात्काळ मंजुरी दिली.
खानदेश मधील विविध पूर्णत्वाकडे येत असलेल्या आणि काही पूर्ण झालेल्या तीन हजार कोटींच्या रस्ते विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री ना. नितीन गडकरी हे आज दि. 22 रोजी जळगाव दौर्यावर आले असता माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांची कार्यक्रम स्थळी भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात म्हटले, नंदुरबार शहराला 20 ते 25 वर्षापूर्वी एका वळण रस्त्याची निर्मिती करण्यात आली होती. त्या वळण रस्त्याचे रुपांतर राष्ट्रीय महामार्ग झाले. महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशात जाणारी वाहतुक ही प्रामुख्याने नंदुरबार शहरातील वळण रस्त्यावरुन जाते. शहरातून जाणाऱ्या याच रस्त्यावर नेहमी अपघात सुध्दा मोठया प्रमाणावर होत असतात. रस्त्याचे चौपदरीकरण करून रस्त्याचामध्ये दुभाजक व स्ट्रीट लाईट लावेत अशी शहरातील नागरिकांची आहे.मागणी नंदुरबार नगरपरिषदेकडे आहे.
शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 बी या रस्त्याचे साखळी क्र. 50/00 ( नवापूर चौफुली) ते साखळी क्र. 57/00 (सी.बी. पेट्रोल पंप) चौपदरीकरण करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
विसरवाडी ते कोळदा रस्त्याचे काम सुरू करा

राष्ट्रीय महामार्ग क्र.752 जी, विसरवाडी – काळंबा- नंदुरबार- कोळदे – शहादा ते खेतिया हा रस्ता महामार्ग म्हणून घोषीत आहे.या महामार्गाचे यापूर्वीच कोळदा-शहादा ते खेतिया रस्त्याचे कॉक्रीटीकरणचे काम पूर्ण होऊन झाले आहे.या महामार्गाचे विसरवाडी – काळंबा – नंदुरबार ते कोळदा पर्यंतचे काम हे अजुन पर्यंत सुरु झालेले नाही. सदरील महामार्गावरील वाहतुकीची समस्या बघता राहीलेल्या विसरवाडी – काळंबा- नंदुरबार ते कोळदे पर्यंतचा रस्त्याचे काम त्वरीत सुरु करणे अत्यंत आवश्यक असल्याचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निवेदनात म्हटले आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची ग्वाही मंत्री नितिन गडकरी यांनी दिल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.









