शहादा l प्रतिनिधी
मतदारसंघातील नागरिकांना आरोग्य सुविधा सहजरीत्या उपलब्ध व्हाव्या यासाठी संपर्क युनिसेफ व प्रथम फाउंडेशन च्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील किमान वीस युवक-युवतींना मोफत आरोग्य विषयक शिक्षण देऊन आरोग्य दूत म्हणून कार्यरत करणार असल्याची माहिती संपर्काच्या प्रमुख मेधा कुलकर्णी यांनी शहादा येथील बैठकीत दिली.

शहादा येथील लोकप्रतिनिधी नागरिक संवाद मंचची बैठक पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी संपर्काच्या प्रमुख मेधा कुलकर्णी तर प्रमुख अतिथी म्हणून युनिट हेड मृणालिनी जोग, संचालक तुषार गायकवाड, मीनाकुमारी यादव उपस्थित होत्या. या बैठकीत मार्गदर्शन करताना श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या, देशात गेल्या दोन वर्षापासून कोरोना विषाणू संक्रमणामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या दोन वर्षाच्या काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्याची गरज असल्याचे प्रत्यक्षात जाणवले आहे. शासनासह लोकप्रतिनिधी आमदार-खासदारांना आरोग्य सुविधा पुरविताना अनेक अडचणी आल्या आहेत. आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती हा महत्त्वाचा घटक असून यासाठी अशा कर्मचार्यांना तयार करणे गरजेचे आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक प्राथमिक आरोग्य केंद्र निवडून त्या अंतर्गत येणाऱ्या गाव पाडयासाठी अठरा वर्षा वरील युवक-युवतींची टिम तयार करण्याचा उद्देश असून प्राथमिक आरोग्य सक्षमीकरणावर भर देण्यात येणार आहे. संपर्क संस्था व प्रथम फाउंडेशन च्या माध्यमातून या युवक-युवतींना तीन महिन्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांना लसीकरण व इतर महत्त्वाच्या बाबी विषयी ज्ञान देणार आहे. विशेष म्हणजे आरोग्य विषयक शिक्षण माहिती असा अभ्यास असणार असून हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन अंतर्गत मान्यताप्राप्त प्रमाणपत्र दिले जाणार असून भविष्यात या प्रमाणपत्राचा उपयोग त्यांना स्वयंरोजगारासाठी होणार आहे. यासाठी आमदार आणि त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील एक प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड करून त्या अंतर्गत येणाऱ्या युवक-युवतींना या प्रशिक्षणासाठी मदत करून त्यांची टीम तयार करणे गरजेचे आहे.
गाव पातळीवर अंगणवाडी हा महत्त्वाचा घटक असतो या अंगणवाड्या सक्षम करणे गरजेचे आहे. अंगणवाडी सेविकांना तज्ञ प्रशिक्षकांना मार्फत प्रशिक्षण देण्यात येईल कुपोषण निर्मूलनासाठी अंगणवाडी परिसरातच परसबाग योजना राबवण्यावर भर देणे गरजेचे आहे. बालकांना सकस आहार सरसकट देण्याऐवजी त्यांना स्थानिक वस्तूंचा आहारात समावेश करणे गरजेचे असून यामुळे कुपोषण निर्मूलनाला मदत होणार आहे. बालकाच्या जन्मापासून पहिले हजार दिवस बालकाचे हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून व्यवस्थित नियोजन केले तर दुर्ग अतिदुर्गम भागातील कुपोषण निश्चितच हद्दपार होऊ शकते यासाठी शासनासोबत लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांनी सामायिक पर्यंत काम करणे काळाची गरज आहे. बैठकीला ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. विष्णू जोंधळे, डॉ.स्मिता जैन, ऍड संगीता पाटील, हिरालाल रोकडे, नेत्रदीपक कुवर, राजेंद्र गायकवाड, डॉ. चंद्रभान कदम, समीर जैन, राहुल छोरिया, सौरभ जाहागिरदार, हर्षल सोनवणे, रुपेश जाधव आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रुपेश जाधव यांनी केले बैठकीत लोकप्रतिनिधी नागरिक संवाद मंचाच्या वतीने करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेण्यात येऊन आगामी वर्षभराच्या कार्यक्रमांचे चर्चा करून नियोजन करण्यात आले आभार ज्ञानेश्वर चौधरी यांनी मानले.
लोकप्रतिनिधी नागरिक संवाद मंचाचे सदस्य व शहरातील प्रसिद्ध डॉक्टर चंद्रभान कदम यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेत तसेच ते गेल्या पाच महिन्यापूर्वी जीवघेण्या अपघातातून सुखरूप वाचले मात्र या अपघातात त्यांना त्यांचा एक पाय कायमचा गमवावा लागला असला तरी कृत्रिम पाया च्या साह्याने ते पुन्हा हिमतीने उभे राहिले व वैद्यकीय सेवेत सक्रिय झाल्याबद्दल त्यांचे मेधा कुलकर्णी व सदस्यांच्या वतीने पुष्पहार व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.








