नंदूरबार l प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ३०६.७७ कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंगळवार दि.२९ मार्च रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या अर्थसंकल्पात ३३.९१ कोटी रुपयांची तुट दर्शविण्यात आली आहे.
कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेची बैठक झाली.मंगळवार दि.२९ मार्च रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक बंडू पाटील यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. विकासाला चालना देणाऱ्या या अर्थसंकल्पात नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी बहूल मोलगी येथे विद्यापीठ संचलित विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयासाठी ५० लाख, ज्ञानस्त्रोत केंद्राद्वारा ग्रंथालयशास्त्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करणेसाठी १५ लाख व पुर्णवेळ संशोधन करण्याऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी २५ लाखाची तरतूद ही अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर चर्चा झाली. या चर्चेत प्रा.एकनाथ नेहेते, प्रा.गौतम कुवर, विष्णू भंगाळे, दिलीप पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, नितीन ठाकूर, मनिषा चौधरी, दिनेश नाईक, अमोल मराठे यांनी भाग घेतला. प्रा. नेहेते व अमोल मराठे यांनी दिलेली कपात सूचना चर्चेअंती समाधान झाल्यामुळे मागे घेतली.








