नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील विविध भागातील गटार व रस्ता विकास कामांसाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत दोन कोटी २९ लाख ५९ हजार १०२ रूपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली असुन सभेत १५ विषयांना मंजुरी देण्यात आली.

नंदुरबार नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा प्रभारी नगराध्यक्ष रविंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवारी रोजी सकाळी ११ वाजेला पालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात घेण्यात आली . सभेच्या प्रारंभी सीडीएस बीपीन रावत यांच्यासह हेलिकॉप्टर दुर्घटनेतील शहीद व पालिकेचे उपनगराध्यक्ष मेहबूब कुरेशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली . नगरपरिषदेची सर्वसाधारण सभेत दि.३१ मार्च २०२२ अखेर एकत्रित मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम एकरकमी भरणार्या मालमत्ता धारकांना चालू वर्षाच्या मालमत्ता करात १० टक्के सूट देण्याच्या निर्णयास मुदतवाढ देण्यात आली.यावेळी सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त लिहितांना ज्या विषयावर चर्चा झाली ते लिहिणे अपेक्षित असल्याचे मत विरोधी नगरसेवक चारुदत्त कळवणकर यांनी व्यक्त केले . कोरोना कालावधीत गाळेधारकांना दुकान भाड्यात सूट देण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता . परंतु , त्यात सूट न मिळाल्याने गाळेधारकांना भाडे भरण्याच्या नोटिसा आल्याचे कळवणकर यांनी सभागृहात सांगितले . त्यावर मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे म्हणाले , जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव पाठवला होता परंतु त्यास मंजुरी मिळाली नाही . त्यामुळे सूट देऊ शकत नाही . या चर्चेत प्रशांत चौधरी यांनी उडी घेत पालिका प्रशासनाच्या माध्यमातून प्रस्तावावर वेळोवेळी पाठपुरावा केला नसल्याचे सांगितले . सर्वसाधारण सभेत नंदुरबार शहरातील दोशाह तकीया ते पुर्वेस देसाईपुरा पेट्रोल पंप पर्यत रस्ता ट्रिमिक्स पध्दतीने करण्यासाठी ८२ लाख ५० हजार ४६४ रूपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली.तसेच दोशाह तकीया पासून ते उत्तरेस जुनी भोई गल्ली ते मंगळ बाजारातील इंडिय स्टोर्स ( नाला ) पर्यंत गटार करणे व रस्ता ट्रिमिक्स पध्दतीने करण्यासाठी ९२ लाख १८ हजार ७३८ रूपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. साक्री नाक्यापासून ते पूर्वस लकी दुबार ते पारशी चक्की पर्यत गटार करणे व रस्ता ट्रिमिक्स पध्दतीने करण्या करीता ५४ लाख ८९ हजार ९०० रूपयांच्या अंदाजपत्रक मंजूरी देण्यात आली.यासह मोकाट गरे पकडल्यानंतर गुरे मालकांना दंड आकारण्या बाबत विचार विनिमय करून सभेत १५ विषयांना मंजुरी देण्यात आली.आयत्या वेळी आलेल्या विषयात नंदुरबार शहरातील संपूर्ण रस्ते डिवाईडर रंगरंगोटी करणे व रोड फर्निचरची कामांच्या संभाव्य खर्चास मान्यता देण्यात आली.








