नंदूरबार l प्रतिनिधी

अनेकांची कमी वेळेत व कमी मेहनतीने पैसा मिळविण्यासाठी धडपड असते. परंतु कमी मेहनतीने मिळणारा पैसा हे अधोगतीचे लक्षण आहे. यादवांनी मद्यप्राशन देवासमोर केल्याने त्यांनाही माफी मिळाली नाही. म्हणुन यादव कुळाचाही नाश झाला. प्रत्येकाला आपल्या कर्माचे भोग भोगायचेच असून पाप-पुण्याचा हिशोब होणारच हे निश्चितच असल्याचे भागवताचार्य प.पु.पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी काल श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे तिसरे पुष्प गुंफतांना सांगितले.

नंदुरबार शहरात नंददर्शन (चित्ते) परिवाराच्या वतीने स्व.जुलालसिंग बाजीराव राजपूत (जिभाऊ) व स्व.उषादेवी जुलालसिंग राजपूत यांच्या स्मरणार्थ आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाला भाविकांचा प्रतिसाद मिळत आहे. या कथा सप्ताहाने नंदनगरी भक्तीमय झाली असुन भागवताचार्य प.पु.पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या संगीमतय अमृतवाणीतून होणार्या श्रीमद् भागवत कथा श्रवणाला भक्त-भाविकांची आवर्जुन उपस्थिती लाभत आहे. काल गुरुवारी सप्ताहाच्या तिसर्या दिवशी स्वायंभूव मनु, सतीचरित्र, धृवचरित्र, प्रियव्रत चरित्र, भरतचरित्र, अजामिळ उध्दार, प्रल्हाद अवतार, नरसिंह अवतार यावर प.पु.पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी कथेचे निरुपन केले. यावेळी प.पु.पं.भगरे गुरुजी म्हणाले की, जीवनात पाप-पुण्याचा हिशोब होणार असून त्यासाठी काय करायवे व काय टाळावे हे प्रत्येकाने ठरवावे. घरातले मिष्ठान्न खातांना लक्ष भलतीचकडे जावू नये. तसेच परस्त्रीच्या देखील नादी लागु नका. कारण रावणात कली शिरला आणि परस्त्रीचा अपमान केला म्हणुन रावणाचाही नाश झाला. कळत व नकळत घडणारी हिंसा सुध्दा नाश करणारी ठरते. जीवनामध्ये विना मेहनतीने मिळविलेले धन व कलीचा झालेला शिरकाव हा विनाशकालीन ठरतो. आज ब्रॅण्डडेचा जमाना असला तरी धार्मिक संस्कृती व परंपरेनुसार श्रीमद् भागवत कथेचे श्रवण केल्यास जीवनाला नवी दिशा मिळते. गौ, गंगा, गायत्री, गीता हे आपल्या संस्कृतीचे चार स्तंभ आहेत. नदीत एक डुबकी मारली की पाप नष्ट होत नाही, तर त्यासाठी कर्म चांगले लागतात. जीवनात हातून पाप होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. श्रीमद् भागवत कथेनुसार श्रीकृष्णाची साधना केल्यास आपोआप सर्व अडचणीतून मार्ग सापडतात. त्यासाठी वयोवृध्द, ज्ञानवृध्द व तपोवृध्दांचा आदर करणे आजही काळाची गरज आहे. नित्य नियमाने प्राणायाम केल्यास इंद्रियांवर ताबा मिळवू शकतो. मनुष्य गाफील आहे त्याचा शेवटचा श्वास कधी येईल याची शाश्वती नाही. करुणावतार, संसारसारम, मागाल ते देणारे भगवान महादेव आहेत. संसार कसा करावा हे भोलेनाथांकडुन शिकावे. तसेच उत्तम संसार करण्यासाठी भोलेनाथांची पुजाअर्चा केल्यास संसार सुखाचाच होईल, असा मौलीक सल्ला भागवताचार्य प.पु.पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी कथेतुन दिला.









