नंदुरबार | प्रतिनिधी
महामार्गावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी येथील पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. अपघात टाळण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस अधिकारी, उपप्रादेशिक परिवाहन अधिकारी यांची बैठक घेतली.
येथील पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या दालनात नंदुरबार जिल्हयातील अपघात प्रवण क्षेत्राबाबत नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग अभियंता, प्रादेशिक परिवहन अधिकारी, महामार्ग सुरक्षा पथक आदी विभागातील जिल्हयातील प्रमुखांची संयुक्तीकरित्या बैठक आयोजीत करण्यात आली होती.
सदर बैठकीत जिल्हयातील विविध रस्ते, राष्ट्रीय व महामार्गावरील वारंवार होणार्या अपघात घटनास्थळाबाबत चर्चा विनिमय करुन सदर ठिकाणी होणार्या अपघातातील जिवीतहानी व मालमत्तेच्या होणार्या नुकसानीबाबत करावयाच्या उपाययोजना संदर्भात व यापुढे अपघात होवुन होणारे जिवीत व वित्तहानी टाळण्याकरीता करण्यात येणार्या उपाय योजनांबाबत चर्चा करण्यात आली.
अपघात प्रवण क्षेत्रात जिवितहानी व मालमत्तेचे नुकसान टाळण्याकरीता दिशादर्शक फलक, स्पीड लिमीट बोर्ड, वळण रस्ता दर्शक फलक, रात्रीच्या वेळी अंधारात चमकणारे स्टड लावण्याबाबत त्याचप्रमाणे राज्य व राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्डयांची डागडुजी करुन रस्ते दुरुस्त करण्याबाबत संबधीत विभागांना सूचना देण्यात आल्यात.
सदर बैठक पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपअधीक्षक सचिन हिरे, श्रीकांत घुमरे, संभाजी सावंत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, एनएचआय पीआययू धुळेचे रविंद्र इंगोले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश कुलकणी, जि.प.बांधकाम अभियंता सोमनाथ पवार, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भावसार, महामार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.एम.काझी, आदी अधिकारी उपस्थित होते.








