नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी नुकतीच शासकीय कृषि महाविद्यालय, नंदुरबारला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी धुळे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल देसले आणि नंदुरबारचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यु. बी. होले प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान कुलगुरूंनी महाविद्यालयाच्या विविध विभागांना, प्रक्षेत्राला व वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. महाविद्यालयाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी आदिवासी कृषी विकास आणि विद्यार्थी विकासाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण सूचना व निर्देश दिले.
विद्यार्थी-भिमुख व शैक्षणिक बाबींवर बोलताना कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना जे.आर.एफ. (JRF), एस.आर.एफ. (SRF) आणि महाराष्ट्र सीईटी (CET) यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विशेष प्रोत्साहन देण्यास सांगितले, तसेच त्यांच्या तयारीसाठी स्वतंत्र विषयांच्या विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी अभ्यास दौरे आयोजित करून महाविद्यालयातील ‘ई-लर्निंग मॉडेल प्रोग्राम युनिट’ सशक्त करत त्यांच्यामध्ये उद्योजकता (Entrepreneurship) विकोपास आणण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांना व्यावसायिक दुग्ध व्यवसायाचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे यासाठी महाविद्यालयात दुग्ध जनावरांसाठी आधुनिक ‘कॅटल फार्म’ सुरू करावा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कॅम्पसमध्ये उच्च दर्जाची वाय-फाय सुविधा द्यावी आणि ज्ञानवृद्धीसाठी बाह्यस्थ शास्त्रज्ञ व तज्ज्ञांची ऑनलाइन-ऑफलाइन सत्रे आयोजित करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
शेतकरी, पायाभूत सुविधा व गाव विकासाबाबत मार्गदर्शन करताना कुलगुरूंनी पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’द्वारे शेततळे किंवा तलाव तयार करण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन चर्चासत्र आयोजित करण्यास सांगितले. शिवण माध्यम प्रकल्प लिफ्ट इरिगेशनचा प्रस्ताव तातडीने मार्गी लावावा आणि उद्यानविद्या विभागाची ‘मॉडेल नर्सरी’ सुरू करण्यासाठी त्वरित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश दिले. नैसर्गिक व जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जैविक खतांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊन आदिवासी शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती करावी व त्यांना हे साहित्य उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन केले. विभागीय विस्तार केंद्रांतर्गत ‘शेतकरी शास्त्र मंच’ स्थापन करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात आणि ‘फुले समृद्ध गाव’ योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या श्रावणी गावाचा विकास करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र व ‘आत्मा’च्या सहकार्याने स्वतंत्र टीम तयार करावी, असे सांगितले. महाविद्यालयाचा आकर्षक प्रोफाईल तयार करून स्थानिक जनप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बाह्य स्रोतांतून निधी उपलब्ध करावा आणि आगामी काळात महामहिम राज्यपालांच्या नियोजित भेटीची उत्कृष्ट तयारी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक प्राध्यापक (कृषि विस्तार शिक्षण) डॉ. दिनेश सूर्यवंशी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्वानी पर्यन्त केले.







