प्रयागराज l प्रतिनिधी
प्रयागराजमध्ये सुरू असलेला महाकुंभ 2025 हा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक पर्व नव्हता, तर तो व्यवस्थापन, नियोजन, आणि सांस्कृतिक एकात्मतेचा एक आदर्श नमुना ठरला. महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर या महाकुंभाची सांगता होत आहे. जगातील सर्वांत मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पर्वाने यंदा अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
◆ 65 कोटींपेक्षा अधिक भाविकांचा महासंगम
सुरुवातीच्या अंदाजानुसार महाकुंभासाठी 40 कोटी भाविक प्रयागराजमध्ये दाखल होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, हा अंदाज पार मागे टाकत 65 कोटींपेक्षा अधिक लोकांनी या पवित्र संगमावर स्नान करून आध्यात्मिक लाभ घेतला.
◆ 5000 कोटींचा खर्च आणि 3 लाख कोटींचा व्यवसाय
उत्तर प्रदेश सरकारने या ऐतिहासिक सोहळ्याच्या आयोजनासाठी 5000 कोटी रुपये खर्च केले. काहींनी या मोठ्या खर्चावर टीका केली, परंतु ‘इकॉनॉमिक टाइम्स’ च्या अहवालानुसार महाकुंभमुळे प्रदेशात 3 लाख कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय झाला. हॉटेल्स, वाहतूक, पर्यटन, हस्तकला, धार्मिक साहित्य आणि खाद्यपदार्थ यांसारख्या विविध क्षेत्रांना या पर्वामुळे प्रचंड आर्थिक चालना मिळाली.
◆ नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि आदर्श कायदा-सुव्यवस्था
इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या एकत्र येऊनही कुठेही अनुशासनाचा अभाव दिसला नाही. कुंभ पर्वाच्या संपूर्ण काळात कुठलीही मोठी भगदड, अनुचित घटना किंवा प्रशासनाचे अपयश दिसून आले नाही, हे उत्तर प्रदेश शासनाच्या उत्कृष्ट नियोजनाचे फलित मानले जात आहे. राज्य सरकारने महाकुंभाच्या सुरळीत आयोजनासाठी राज्य प्रशासनातील सर्वाधिक सक्षम आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रयागराज येथे केली होती. यामध्ये वाहतूक, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, सफाई, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आणि इतर महत्त्वाच्या विभागांचा समावेश होता.
◆ संघटनांचा योगदान आणि धार्मिक ऐक्याचा संदेश
या भव्य आयोजनामध्ये सरकारी यंत्रणांसोबतच विविध आखाडे, धार्मिक संस्था, सामाजिक संघटना आणि स्वयंसेवकांचे मोठे योगदान राहिले. संपूर्ण भारतातून आणि जगभरातून लाखो साधू-संत, धर्मगुरू, तसेच विविध जात-पंथांचे लोक येथे एकत्र आले होते. भारतीय समाजातील ऐक्य आणि समरसतेचा संदेश या पर्वाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दृढ झाला.
◆ जगभरात भारताच्या सांस्कृतिक शक्तीचा नवा ठसा
महाकुंभाच्या भव्यतेने पुन्हा एकदा जगभरात भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा ठसा उमटवला आहे. कुंभमेळा हा केवळ धार्मिक उत्सव नसून, तो व्यवस्थापन, आर्थिक प्रभाव, सामाजिक सलोखा आणि भारतीय संस्कृतीच्या महानतेचा उत्तम प्रतीक आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी संपणारा हा महाकुंभ इतिहासात सर्वाधिक गर्दी, उत्तम नागरी सुविधा, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि आर्थिक भरभराट घडवणारा कुंभ म्हणून ओळखला जाईल. भारताच्या अध्यात्मिक, सामाजिक आणि प्रशासनिक ताकदीचे हे एक सर्वोत्तम उदाहरण ठरले आहे.