नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार शहरातील मधुबन कॉलनी अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडत घरातून धाडसी चोरी केल्याची घटना 7 फेब्रुवारी रोजी उघड झाली. घरमालक कौटुंबिक कार्यक्रमासाठी गावाला गेले असताना ही घरफोडी झाली आहे. नंदुरबार शहराचा जिल्ह्यात घरफोडीचे सत्र वाढल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नंदुरबार शहरातील मधुबन कॉलनीत राहणारे अविनाश अमृत भामरे हे कौटुंबिक कार्यक्रमासाठी बुधवार रोजी गावाला गेले होते.दरम्यान ते घरी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी 6 फेब्रुवारी सायंकाळी 7 ते 7 फेब्रुवारी सकाळी आठ वाजे दरम्यान त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.घरात त्यांनी सामानाचे उलथापालथ केली. घरमालक अविनाश भामरे बाहेरगावी असल्याने घरात नेमकी किती चोरी झाली हे कळू शकले नाही. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती अविनाश भामरे यांना दिली.
त्यानंतर अविनाश भामरे यांनी फोनवरून पोलिसांना सदरची माहिती दिली. घरफोडीची बातमी कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ आपल्या पथकासह दाखल झाले. त्या ठिकाणची तपासणी केली. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानाने धुळे रस्त्या पर्यंत मार्ग दाखवला.
नंदुरबार शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चोरीचे सत्र सुरू असून चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे चित्र दिसून येत आहे. या भागात पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालावी अशी मागणी मधुबन कॉलनीतील नागरिकांनी केली आहे.