नंदुरबार l प्रतिनिधी
बसमधून अवैधपणे गुटख्याची वाहतुक करणा-यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई केली असून 14 लाख 41 हजार 640 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि.5 फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 सुरत-नागपुर वरुन गुजरात राज्यातील सुरत येथून G.S.R.T.C. बस ( क्रमांक G.J.18 Z.T.0965) यामध्ये एक इसम महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा स्वतःचे कब्जात बाळगुन त्याची बेकायदेशीररित्या महाराष्ट्र राज्यात विक्री करण्याचे उद्देशाने घेऊन जात आहे, अशी खात्रिशीर माहिती मिळाली. सदर माहितीचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मिळालेल्या बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी लागलीच पथकास रवाना केले.
मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोलीस पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील नवापूर सिमातपासणीजवळ एका हॉटेलसमोर सापळा रचला. थोडया वेळाने मध्यरात्रीचे सुमारास सोनगढ गावाकडून नवापूरकडे एक गुजरात G.S.R.T.C. बस पथकाचे दिशेने येतांना दिसली. तिस पोलीस पथकाने हाताचा इशारा देऊन थांबविले असता तिचे दर्शनी भागावर (GJ 18 ZT 0965 ) असा क्रमांक दिसुन आला.
सदर बस गोधरा-शिर्डी जाणारी असल्याचे समजले, मिळालेल्या माहितीप्रमाणे खात्री करण्यात आली असता, सदर बसमध्ये एकुण 09 पांढ-या रंगाच्या अवैध गुटख्याच्या गोण्या मिळून आल्या. सदर गोण्या कोणाचे असलेबाबत बसचालक सुरेश भारीया व वाहक दिनेशभाई भारीया यांना विचारणा करता त्यांनी सदरचा माल हा बसमधील त्यांचे ओळखीचा नवापूर येथील प्रवासी रज्जाक लाखाणी याचे असल्याचे सांगितले.
सदर बसमधील नमुद रज्जाक लाखाणी यास ताब्यात घेऊन त्याचे पुर्ण नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव रज्जाक अजीजभाई लाखाणी, रा.लाखाणी पार्क, नवापूर ह.मु. अमनपार्क, नवापूर असे सांगितले. त्यानंतर सदर G.S.R.T.C. बस क्रमांक GJ18 ZT 0965 वरील चालक व वाहक यांना नमुद गोण्यांचे लगेज (सामान पावती) काढले अगर कसे बाबत विचारणा करता त्यांनी सदर गोण्यांची कुठलीही लगेज पावती काढले नसल्याचे कळविले.
तरी सदर इसमाचे कब्जातील गोण्यांची तपासणी करता त्यामध्ये एकुण 9 पांढ-या रंगाच्या गोण्यांमध्ये विविध प्रकारचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा, तंबाखु इ. असा वाहनासह एकुण 14 लाख 41 हजार 460 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. त्याअन्वये रज्जाक अजीजभाई लाखाणी रा.लाखाणी पार्क, नवापूर,बसचालक सुरेश दलसिंग भारीया रा. चारलफलीकया, कोटा, ता.संजेली, जि. दाहोद, गुजरात बसवाहक- दिनेशभाई छगनभाई भारीया रा.प्राथमिक शाळा, निशालफलीया, नाना आमलिया, ता. सिंगवड जि. दाहोद गुजरात अशांचे विरुध्द नवापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275 3(5) सह अन्न सुरक्षा व मानके अधि. 2006 चे कलम 26(2) (iv), 30 (2) (a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोहवा महेंद्र नगराळे, जितेंद्र तांबोळी, पोना जितेंद्र तोरवणे अशांनी केली आहे.