नंदुरबार l प्रतिनिधी-
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन येत्या 12 फेब्रुवारी 2022 ला नंदुरबार शहरात होणार असून हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार आहे. जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावरचे अधिवेशन यशस्वीतेसाठी पूर्व कार्यकर्त्यांसह सर्वांचे प्रयत्न मोलाचे ठरणार आहेत. असे प्रतिपादन अभाविपचे पश्चिम क्षेत्रिय संघटनमंत्री देवदत्त जोशी यांनी केले.
येथील कन्यादान मंगल कार्यालयात रविवारी अभाविपच्या प्रदेश अधिवेशना संदर्भात वर्तमान आणि पूर्व कार्यकर्त्यांसह बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी दीपप्रज्वलनासह सरस्वती माता आणि स्वामी विवेकानंद प्रतिमांचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. मनिष जोशी, नंदुरबार जिल्हा प्रमुख डॉ. दिनेश खरात, जिल्हा संयोजक राजेंद्र पावरा उपस्थित होते. भारतीय विद्यार्थी परिषदेचे 56 वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन येत्या फेब्रुवारी महिन्यात नंदनगरीत होणार आहे. याबाबत बोलताना देवदत्त जोशी म्हणाले की, नव्या पिढीला अभावीप कळावे यासाठी अधिक जोमाने कामाला लागणे गरजेचे आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वव्यापी होण्यासाठी प्रयत्न करावे. वनवासी जिल्ह्यातील प्रदेश अधिवेशन यशस्वितेसाठी सर्वांच्या मदतीची गरज असून जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी प्रयत्न व्हावेत. डॉ.मनिष जोशी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कार्यकर्ता हायटेक पद्धतीने या अधिवेशनानिमित्त येणार असून आदिवासी संस्कृती, वर्तमान कार्यकर्ते आदींचा समावेश असेल. कायमस्वरूपी स्मरणात राहणारे अधिवेशन विद्यार्थ्यांच्या जीवन कार्याला दिशा देणारे ठरणार आहे. सातपुड्यातील खाद्य संस्कृतीची चव उभ्या महाराष्ट्राला यानिमित्त चाखता येणार आहे. प्रा. डॉ. दिनेश खरात यांनी अधिवेशनास संदर्भात प्रास्ताविकातून भूमिका मांडली. याशिवाय बैठकीत प्रा. गिरीश महाजन, अभिजीत खेडकर, प्रकाश चौधरी, शशिकांत घासकडबी, प्रा. एच. के. चव्हाण, गौरीशंकर धुमाळ, पंकज पाठक, राजू पावरा, दाज्या पावरा आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विनया मोडक यांनी केले.