शहादा l प्रतिनिधी-
पंतप्रधान घरकुल योजना ही सामान्य गोरगरिब जनतेकरिता आहे. पिंगाणे ता. शहादा येथील घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांचे ‘ड’ यादीतील सर्वेक्षण पुन्हा करून यादीत नाव समाविष्ट करून केंद्राकडून लवकरच त्यांना घरकुल योजना तसेच समाज मंदिर शौचालय आदी सर्व विषयांवर तोडगा काढून शौचालयावर झालेला भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांकडून वसुली करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे खासदार डॉ.हिना गावित यांनी आज उपोषणकर्त्यांना आश्वासन देऊन उपोषण सोडले.
पिंगाणे ता. शहादा येथील ७८ ग्रामस्थांच्या घरकुल योजना ‘ड’ यादीतील सर्वेक्षण करत असताना नाव गाळण्यात आल्याचा आरोप तसेच महिला – पुरुष शौचालयात झालेला भ्रष्टाचार, समाज मंदिर बांधकाम यासह विविध विषयांना घेऊन पिंगाने ग्रामस्थांनी गेल्या तीन दिवसांपासून शहरातील जुन्या तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. आज तिसऱ्या दिवशी दुपारी खासदार डॉ. हिना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, शहादा उपविभागीय प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, शहादा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी ,भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. कांतिलाल टाटिया, गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी महेश घुगरे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत आदी अधिकाऱ्यांसह प्रांताधिकारी कार्यालयात सुमारे दीड ते दोन तास ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होऊन दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास खा. डॉ. हिना गावित यांनी उपोषण स्थळी जाऊन त्यांच्याशी विस्तृत चर्चा करताना म्हटले की, पिंगाणे येथील घरकुल योजनेतील ७८ व्यक्तीं सह तालुक्यात घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या सर्वांचे यादीतील सर्वेक्षण पूर्ण करण्यात येईल. पहिली ‘ड’ पत्रात ज्यांची नाव नसेल त्यांचे नाव पुन्हा समाविष्ट करण्यात येईल त्याबाबत पंचायत समिती मार्फत नवीन अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. समाज मंदिर याबाबत सातबारा उताऱ्याची तपासणी करुन प्रांत अधिकारी डॉ. गिरासे त्यावर निर्णय घेतील. समाज मंदिर असलेली जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे किंवा कोणाची आहेत हे तपासण्यात येईल ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर कोणाचाही अधिकार राहणार नाही. सातबारा निघाल्यानंतर मार्ग मोकळा होणार असल्याचे देखील खा. डॉ.हिना गावित यांनी म्हटले आहे. येथील पुरुष व महिला शौचालय बांधकाम झालेले आहे. शौचालयाचे बांधकाम करण्यात आल्याचे दाखवण्यात आले त्याच्या निधी ठेकेदाराने काढून घेतलेला आहे परंतु गावात शौचालय नाही याबाबत तपासणी करुन बांधकाम केलेल्या ठेकेदारांकडून अधिकाऱ्यांकडून संबंधित वसुली करण्यात येईल व अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येणार असल्याचे खा. डॉ. हिना गावित यांनी म्हटले आहे.