नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील करण चौफुलीपासून जवळच असलेल्या बायपास रस्त्यावर गुरुकुल नगरकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने प्रेस फोटोग्राफर विशाल हिरालाल चौधरी या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील गोकुळधाम सोसायटीत राहणारा विशाल हिरालाल चौधरी ( वय ३०) हा तरुण स्कूटीने बायपास रस्त्यावरून जात होता. करण चौफुलीपासून जवळच असलेल्या गुरुकुल नगराकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात विशाल चौधरी हा तरुण गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाला.
अपघात घडताच ट्रकचालक वाहनासह पसार झाला. विशाल चौधरी हा फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय करीत होता. दरम्यान काल सोमवारी धुलीवंदनाच्या दिवशी विशालने आपल्या पत्नी व कुटुंबीयांसोबत धुळवडही खेळली. त्या धुळवडीच्या क्षणीचे फोटो विशालने आपल्या फेसबुक स्टेटसवर देखील कालच ठेवले होते.विशाल चौधरी याच्यावर काल रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आरटीओ विभागाची बेपर्वाई
विशाल चौधरी या युवकाचा अपघात झाला.त्यावेळी आरटीओ विभागाची गाडी जवळून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियातील व्हायरल झाला.या बाबत नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.