नंदुरबार l प्रतिनिधी
शहर व परिसरातील वळण रस्त्यावरून तांत्रिक दोष असलेल्या सुमारे 70 वाळू डंपर वाहनांवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे चार लाख रुपये दंड वसूल करण्यात आले. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या या कारवाईचे सर्वसामान्य जनतेतून स्वागत होत आहे.
प्राप्त माहितीनुसार शहरात आठ दिवसापूर्वी धुळे चौफुलीवर वाळूचा डंपरने धडक दिल्याने एका शालेय विद्यार्थिनीचा बळी गेला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी दुपारी वळण रस्त्यावर वाळूचा डंपरने धडक दिल्याने दुचाकीस्वार छायाचित्रकार जागीच ठार झाला. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने तातडीने मंगळवारी दुपारी चार वाजेपासून वाळू वाहतूक करणाऱ्या आणि तांत्रिक दोष असलेल्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर वाहनांवर धडक कारवाई केली. सुमारे 70 डंपर वाहनचालकांना एकाच वेळी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात जप्त करण्यात आले.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव,सहायक मोटार वाहन निरीक्षक राहुल सरोदे, गिरीष पाटील, प्रितेश भावसार,दीपक राजपूत,अमित तडवी,प्रवीण राहणे,माणिक कोरे,सागर सोनवणे, बाबसाहेब गायकवाड,संध्या जाधव,भूषण मोरे,नवल पवार,नरेश महाजन, यांच्या पथकाने कारवाई केली. वाहन चालक वाळू वाहतूक करणाऱ्या एकूण 70 वाहनांवर कारवाई करण्यात आली.. वाहनांची यांत्रिक तपासणी करून सुमारे चार लाख रुपये दंड आकारण्यात आला.