नाशिक l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत अहमदनगर जिल्ह्यात नाशिक विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. हा मेळावा 28 व 29 फेब्रुवारी रोजी भिस्तबाग महल मैदान, अहमदनगर येथे होणार असून या मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. त्यानुषंगाने नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी बेरोजगार युवक-युवतींची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच जास्तीत जास्त आस्थापनांनी सहभागी होऊन रोजगार उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
“नमो महारोजगार मेळावा” संबंधीची पूर्वतयारी आढावा बैठक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुजय विखे पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कौशल्य विकास विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा, जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सालीमाठ, जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी नंदुरबार सुधीर खांदे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त सुनिल सैंदाणे, उपायुक्त राणी ताटे, तहसिलदार कुंदन हिरे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नाशिकचे सहसंचालक रविंद्र मुंडासे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, नाशिक इंद्रशाम काकड, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, धुळे मनोजकुमार चकोर दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
महसूल मंत्री श्री.विखे पाटील पुढे म्हणाले की, या रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त कंपन्यांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती द्यावी. तसेच जास्तीत जास्त शहरी व ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण-तरुणींपर्यंत या “नमो महारोजगार” मेळाव्याची माहिती पोहोचवावी. त्यांची पोर्टलला नोंदणी करून घ्यावी. हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी संबधित सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी व रिक्त पदे अधिसूचित, जाहीर करणे तसेच उमेदवार नोंदणी व रिक्त पदांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
जास्तीत जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी शासकीय तंत्र निकेतन, विविध औद्योगिक संस्था, नाशिक विभागातील सर्व विद्यापीठे यांचा देखील समावेश करण्यात यावा. तसेच मेळाव्याच्या ठिकाणी तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र तयार करावे. रोजगार मेळाव्याबाबत विविध माध्यमाद्वारे प्रचार प्रसिध्दी करावी व नोंदणीसाठी डिजीटल माध्यमद्वारे नोंदणीसाठी लिंक तयार करणे व सदर लिंक जिल्हा परिषद, महानगरपालिका समाज कल्याण विभाग व इतर विभागाच्या पोर्टलवर लिंक उपलब्ध करुन देण्यात यावी व आपल्या पोर्टलवरील नोंदणीकृत असलेले उमेदवार व उद्योजक/आस्थापना यांना मेळाव्यास सहभागी होणेसाठी प्रोत्साहित करावे असे, असेही श्री विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करावे.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक विभागातील रोजगार मेळव्याच्या तयारीबाबतची माहिती महसूल मंत्री श्री.विखे पाटील यांना सादर केली. यावेळी श्री.गमे यांनी सांगितले की, रोजगार मेळाव्यात एकूण 200 पेक्षा अधिक आस्थापना सहभागी होणार असून 30 हजार उमेदवारांची उपस्थिती अपेक्षित आहे. तसेच प्राथमिक निवड मध्ये 15 हजार उमेदवारांची निवड होऊन 10 हजार उमेदवारांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. तसेच सर्व जिल्हाधिकारी यांचेशी वेळोवेळी संपर्क साधून मेळव्याच्या नियोजनाबाबत आढावा घेण्यात येत असल्याचे, श्री. गमे यांनी सांगितले.
महसूल मंत्री श्री.विखे पाटील यांना विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांनी जिल्हानिहाय मेळाव्याच्या तयारीची माहिती दिली.