नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील ११ जिल्हा परिषद गट व 13 पंचायत समितीच्या गणांसाठी उद्या दि. ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून यासाठी प्रशासन सज्ज असून प्रक्रिया पार पाडण्यासाठी कर्मचारी आज साहित्यासह रवाना करण्यात आले. दरम्यान या मतदानासाठी जिल्ह्यात ४५६ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून २ लाख ८२ हजार ३८७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
उच्च न्यायालयाचा ओबीसी आरक्षण निर्णयानंतर नंदुरबार जिल्ह्यातील ११ जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या १3 गणांसाठी उद्या दि. ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यात प्रशासनातर्फे ४५६ मतदान केंद्राची नियुक्ती करण्यात आली आहे. यात अक्कलकुवा ३४, शहादा १८६, नंदुरबार २३६ यांचा समावेश आहे. यावेळी अक्कलकुवा तालुक्यात स्त्री मतदार १२ हजार ७०८ तर पुरूष १२ हजार ६२३ एकूण २५ हजार ३३१, शहादा तालुक्यात स्त्री ५७ हजार ३३९ तर पुरूष ५९ हजार ८६८ असे एकूण १ लाख १७ हजार ४०७ तर नंदुरबार तालुक्यात स्त्री ६९ हजार ३०१ तर पुरूष ७० हजार ३३८ एकूण १ लाख ३९ हजार ६४९ असे एकूण जिल्ह्यातील २ लाख ८२ हजार ३८७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. प्रशासन मतदानासाठी सज्ज झाले असून आज नंदुरबार शहरातील वखार महामंडळात कर्मचार्यांना मतदानासाठी लागणार्या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी मिनल करनवाल, तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी कर्मचार्यांना मार्गदर्शन केले. या निवडणुक प्रक्रियेसाठी २ हजार ७४२ कर्मचार्यांची नियुक्ती प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. कर्मचारी साहित्य घेवून विविध वाहनातून मतदान केंद्राकडे दुपारी रवाना झाले.
नंदुरबार जिल्हा परिषदेचे ११ गट व पंचायत समितीचे 13 गणांसाठी पोटनिवडणुकीसाठी काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले होते. या निवडणुकीत मोठया प्रमाणावर चुरस निर्माण झालेली दिसून आली.