नंदुरबार | प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार, 5 ऑक्टोबर, 2021 रोजी मतदान तर 6 ऑक्टोबर, 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार मतदान केंद्र व मतमोजणीच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेश निर्गमित केले आहे.
जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गणाच्या मतदान केंद्रावर 5 ऑक्टोबर, 2021 रोजी सकाळी 6 ते सांयकाळी 6 वाजेपर्यंत तसेच 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयामार्फत निश्चित केलेल्या मतमोजणीचे ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून ते मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यत हे आदेश लागू असतील.
हे आदेश लागू केल्यामुळे पुढील गोष्टीस मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्राचा 200 मीटर परिघ हा मतदान केंद्राध्यक्षाच्या ताब्यात राहील. मतदान केंद्र खाजगी इमारतीत असल्यास सदर मतदान केंद्राच्या 200 मीटर परिघात खाजगी इमारतीचा मालक व त्यांचे सुरक्षा रक्षक प्रवेश करणार नाही. आचारसंहितेच्या संपूर्ण काळात सार्वजनिक ठिकाणी शस्त्र जवळ बागळता येणार नाही. मतदानाचे दिवशी मतदान केंद्राचे ठिकाणी 200 मीटर परिसरात निवडणुकीचे कामा व्यतिरिक्त कोणताही व्यक्ती प्रवेश करणार नाही असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.