म्हसावद । प्रतिनिधी
शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी चांगला दर दिल्यास शेतकरी आपोआप बाजार समितीने सुरू केलेल्या कापूस खरेदी केंद्रात कापूस विक्रीसाठी आणणार आहे.बाजार समितीला उच्चशिक्षित सभापती लाभल्याने चांगले शेतकरी हिताचे निर्णय संचालक मंडळाकडून घेतले जात आहेत. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीमागे शेतकऱ्यांनी उभे राहिले पाहिजे. नेतृत्वावर व नेत्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. शेतकऱ्यांना पर राज्यात उत्पादित कापूस विक्रीसाठी जाण्याची आता गरज नाही शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. जिल्ह्याला न्याय देण्याच्या प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले.
शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी श्री पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल ,देव मोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कुमार गावित ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे ,जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, राजू बाविस्कर ,संजय पाटील, अमळनेरचे माजी पंचायत समिती सभापती श्याम पाटील, सुभाष पाटील, संजय मोरे, अमोल पाटील ,बाजार समितीचे उपसभापती डॉ. सुरेश नाईक आदिंसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विविध मान्यवर व पालकमंत्र्यांचा हस्ते उपस्थित शेतकऱ्यांच्या कापसाचा लिलावाचा प्रारंभ करण्यात आला यावेळी कापूस खरेदीसाठी विविध जिनिंगचे व्यापारी उपस्थित. यावेळी पालकमंत्री म्हणाले,शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने खरेदी केंद्र सुरू केल्यास शासनाचे पैसे आज ना उद्या मिळतील परंतु व्यापारांच्या आर्थिक हिमतीला मानावे लागेल बाजार समितीने ही हिम्मत दाखवली त्याला साथ देणे गरजेचे आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आपल्या वाहनात कापूस विक्रीसाठी आणला आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला आणताना चांगल्या दर्जाचा आणावा या खरेदी केंद्रातून बाजार समितीला मोठे यश प्राप्त होणार आहे.लिलाव चालू असताना शेतकऱ्यांनी संयम ठेवावा.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील म्हणाले की,बाजार समितीने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
पहिलेच कापूस केंद्र सुरू झाल्याने गुजरात मध्य प्रदेश राज्यात जाणारा कापूस आता या ठिकाणी शेतकऱ्यांना विकता येणार आहे. शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 175 वाहनात शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणला. शेतकरी व व्यापारी यांच्यात समन्वय राहावा यासाठी वांदा समिती ही नेमण्यात आली आहे. शेतकरी व व्यापारी यांच्यात काही वाद उद्भवल्यास तो तंटा वांदा समिती मार्फत मिटवला जाणार आहे.दोन मतदारसंघात तालुका विभागला गेल्याने स्व. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्यानंतर शहादा तालुक्याला हक्काचे स्थानिक आमदार मिळाले नसल्याने विकासाच्या अनेक गोष्टी प्रलंबित आहेत. पालकमंत्री म्हणून आपण नक्की तालुका वासियांना मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा नियोजन मधून इतर बाजार समित्यांना निधी मिळाला आहे त्याच पद्धतीने शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीला मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी निधी मिळावा अशी मागणी केली.
यावेळी शहाद्याचे माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हिताच्या निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांसाठी आज सोन्याच्या दिवस आहे. परिसरात कापूस, ऊस आदी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. येथील शेतकरी खूप सहनशील आहे. त्यांच्यावर कितीही अन्याय झाली तरी भविष्याची चिंता न करता लगेच तो कामाला लागतो सुशिक्षित असल्याने नवनवीन प्रयोग करून अधिकाधिक उत्पादन घेण्याच्या प्रयत्न करतो.
प्रकाशा येथील माजी सरपंच हरी पाटील यांनी प्रास्ताविक केले त्यांनी प्रास्ताविका कापूस खरेदी केंद्राची माहिती दिली.त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध अडीअडचणींची माहिती देण्यात आली. यंदा अल्प पाव झाल्याने उत्पादनही कमी प्रमाणात आली आहे खरीप हंगाम संपल्यात जमा असून मात्र अद्यापही पीक विमा कंपनीतर्फे कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही शिवार फेरी पीक शेतातून निघाल्यानंतर काढली जाते यात शासन व शेतकरी यांच्यात संघर्ष निर्माण होतो वंचित मंडळांना न्याय द्यावा सरसकट नुकसान भरपाई मिळावी शेतकरी विकासाच्या केंद्रबिंदू मानून शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी व कापूस खरेदीदार व्यापारी उपस्थित होते.
कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ कर्मचारी वर्ग व विविध संस्थांचे संचालक मंडळ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते








