नंदूरबार l प्रतिनिधी
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे हस्ते विविध गुन्ह्यातील सुमारे 47 लाख रुपयांचा मुद्देमाल मुळ तक्रारदारांना परत करण्यात आला.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील हे आगामी सण, उत्सवाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आढावा, गुन्हे आढावा घेण्यासाठी आले असता त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे भेट देवून पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेख, स्वच्छता याबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी नंदुरबार शहर पोलीस ठाणे याठिकाणी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी यासारख्या जिल्ह्यातील मालमत्तेच्या गुन्ह्यांचा पोलीस दलाकडून तपास करुन तो उघडकीस आल्यानंतर मिळालेला मौल्यवान मुद्देमाल व वाहने मुळ फिर्यादींना परत करण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना नोंद असलेल्या गहाळ मोबाईलबाबत पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी माहिती घेतली असता मोठ्या प्रमाणावर मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात तक्रारदारांनी मोबाईल हरविल्याबाबत दिलेल्या तक्रारींचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांचे नेतृत्वाखाली तांत्रिक विश्लेषण शाखेने विश्लेषण करुन नंदुरबार, धुळे, जळगांव जिल्ह्यात व गुजरात, मध्य प्रदेश राज्यात जावुन त्यांचा शोध घेवुन त्यांच्याकडुन मोबाईल हस्तगत करण्यात आले. हस्तगत करण्यात आलेले सुमारे 12 लाख रुपये किमतीचे 125 मोबाईल नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे हस्ते मुळ तक्रारदारांपैकी 15 तक्रारदारांना प्रातिनिधीक स्वरुपात सन्मानपूर्वक परत करण्यात आले. हरविलेल्या मोबाईलचा शोध घेवून ते प्राप्त करून मुळ तक्रारदारांना परत करण्याच्या कामगिरीत नंदुरबार जिल्हा अग्रेसर राहिला आहे.
तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून उघडकीस आणलेल्या दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी यासारख्या जिल्ह्यातील मालमत्तेच्या 30 गुन्ह्यातील 35 लाख 97 हजार 034 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने, मोटार सायकली, रोख रक्कम व इतर मुद्देमाल तसेच नागरिकांचे गहाळ / हरविलेले 12 लाख रुपये किमतीचे 120 मोबाईल असा एकुण सुमारे 48 लाख रुपयांचा मुद्देमाल नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते मुळ तक्रारदारांना परत करण्यात आला. चोरीस गेलेली मालमत्ता व हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त झाले.
यावेळी उपस्थितीतांपैकी काही मुळ मालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी पोलीस दलाच्या कामाचे कौतूक करुन पोलीस दलावरील विश्वास दृढ झाल्याचे सांगितले. कार्यक्रमादरम्यान एका जेष्ठ महिला फिर्यादी यांनी भावना विवश होत त्यांचे परत मिळालेले सौभाग्याचे लेणे त्यांच्या पतीच्या हाताने गळ्यात घालण्याची विनंती केल्याने त्यांचे पती यांना बोलावून त्यांच्या हस्ते त्यांच्या पत्नीच्या गळ्यात सौभाग्य लेणे घालण्यात आले. त्यावेळी त्यांचे आंनदाश्रु त्या लपवू शकल्या नाही.
मंगळसूत्र हे स्त्रीच्या भावनांशी निगडीत असते, त्यामुळे कोणी अज्ञात चोरटा ते तिच्याकडून हिसकावून नेतो तेव्हा तिला प्रचंड मानसिक त्रास होतो. स्त्री मंगळसुत्रला सौभाग्यच प्रतीक समजते, म्हणून स्त्रीसाठी मंगळसूत्र हे खूप महत्वाचे असते. सौभाग्याचा लेणे असो की, जनतेने मेहनतीने कष्ट करुन घेतलेली मोटार सायकल किंवा इतर कोणताही मौल्यवान वस्तु असो तो परत देत असतांना मनस्वी आनंद होत आहे, असे यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्यासह नंदुरबार विभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.