नवापूर l प्रतिनिधी
विसरवाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोन व्यक्तींना आठ ते दहा व्यक्तींनी गाठून बेदम मारहाण केली . यामुळे बाजारात एकच पळापळ झाली . याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून संशयित 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी भेट दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे गुरुवारी बाजाराचा दिवस असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती बाजार भरलेल्या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आवारात सुमारे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास युवकांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना कडून मिळाली त्यात गंगापूर येथील राजेश फुलसिंग वसावे हा युवकाला धारदार शस्त्राने वार करून जबर मारहाण झाल्याने हाता पायाला दुखापत होऊन व रक्तस्राव झाल्याने गंभीर जखमी झाला. त्यास विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे हलविण्यात आले. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीत आवारात दोन गटांमध्ये मारहाण झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली असता राजेश वसावे या युवकास गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले व जमलेल्या गर्दीत पागविले. जखमी गंगापूर येथील जखमी युवकाच्या नातेवाईकांनी व मित्रांनी मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. याप्रकरणी युवराज पाडवी यांच्या फिर्यादीवरून 11 जणांविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील उमेश गावीत व जिग्नेश गावीत यांना अटक करण्यात आली असून इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखता नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व पोलीस अंमलदार, नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पोलिस अंमलदार तसेच नंदुरबार येथून दंगा नियंत्रण पथक पाचारण करण्यात आले आहे. विसरवाडी गावात तणावपूर्ण शांतता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे तर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.