नंदूरबार l प्रतिनिधी
सामान्य नागरिकांच्या विविध सरकारी कार्यालयाशी संबंधित प्रलंबित कामे, तक्रारी वा प्रश्न असतात, बऱ्याचवेळा त्यांना दाद मिळत नसल्याने एकाच ठिकाणी जनतेचे प्रश्न सुटावेत याउद्देशाने धडगाव तहसील कार्यालयात विधानपरिषचे आ. आमश्या पाडवी यांनी जनता दरबार भरवला.
यावेळी सर्व सामान्य जनतेची गाऱ्हाणे आ. पाडवीनी ऐकून घेत काही अधिकाऱ्यांना जागेवरच घेरल्याचे या जनता दरबारात दिसून आले. या जनता दरबारात महसूल, ग्रामविकास, बांधकाम, आरोग्य, कृषी,शिक्षण, वनविभाग,पोलिसविभाग , आरोग्य,वीज मंडळ, महिला व बालविकास या सह सर्वच विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यां विरोधात जनतेने तक्रारी, प्रश्न व गाऱ्हानी मांडल्या यात तोरणमाळच्या पायथ्यापासून ते हुंडा रोषमाळ पर्यन्तच्या अतिदुर्गम भागातील नागरिकांसह तालुक्यातील कानकोपऱ्यातील नागरिक उपस्थित होते. यावेळी सर्वच विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात जनतेने आ. पाडवी यांच्या पुढे तक्रारी केल्या.
यावेळी काही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न आल्याने खडसावत कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांना यावेळी आ.श्री.पाडवी यांनी जाब विचारत तंबी दिली. यात महसूल विभागांतर्गत येणाऱ्या प्रलंबित सातबारा नोंदी व दुरूस्ती, शिधापत्रिका, पीएम किसान, वनपट्टे दावे, कृषी विभागाच्या योजना, रोहयो व वनविभागतल्या अडचणी, तोरणमाळ व गौऱ्या भागात पाणी टँकर चालु करण्याविषयी सूचना आमदार पाडवी यांनी तहसीलदार यांना सूचना केल्या.

यात पंचायत समिती, पाटबंधारे, महावितरण, आरोग्य विभाग, पोलिस विभाग, वनविभाग, बांधकाम सह बाकी विभागांसंदर्भात मोठ्या प्रमाणात लेखी तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून तक्रारींचा निपटारा लवकरात लवकर करण्याचे आदेश देण्यात आलेत. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके, जि.पसमाज कल्याण सभापती शंकर पाडवी, शिवसेना जिल्हा संघटक रामभाऊ वाडीले, शिवसेना जिल्हा युवा अधिकारी ललित जाट, जिल्हा समन्वयक रोहित चौधरी,सामाजिक कार्यकर्ते गोलू चंदेल,जसू पवार, हर्षल बोरा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सध्या सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झाली असतांना याविषयी अनेक गावाच्या तक्रारी प्राप्त झाल्या.मात्र, संबंधित विभागाचे अधिकारी अनुपस्थित दिसून आल्याने आमदार आमश्या पाडवी यांनी नाराजी व्यक्त करत बैठकीला अनुपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
शिक्षण सभापती गणेश पराडके यांनी अधिकाऱ्यांनी दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देऊन शासकीय योजनाविषयी जनजागृती करण्यात यावी असे आवाहन विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकी दरम्यान केले.








