नंदुरबार l प्रतिनिधी
शिक्षक ध्येय संस्था, नाशिक तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार येथील कमला नेहरु कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक प्रा.सरदार गुंजार्या पावरा यांना जाहीर झाला आहे. कोरोना पार्श्वभूमीवर छोटेखानी कार्यक्रमात पश्चिम खान्देश भगिनी सेवा मंडळाचे अध्यक्ष अतुल अजमेरा तसेच सचिव सौ.स्मिता अजमेरा यांच्या हस्ते नुकतान प्रा.पावरा यांना प्रदान करण्यात आला.
राज्यातील सर्व शिक्षक एकत्र येत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार्या शिक्षकांना शिक्षक ध्येय संस्था, नाशिक यांच्यातर्फे राज्यस्तरीय कर्तृत्ववान पुरस्कार प्रदान करण्यात येतो. शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या पुरस्कारामागील हेतू आहे. प्रा.सरदार पावरा हे येथील कमला नेहरु कन्या कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांनी कोरोना काळात विद्यार्थीनींसाठी ‘शाळा बंद पण शिक्षण सुरु’ उपक्रम उपक्रमातर्ंगत नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण भागात विद्यार्थिनींच्या घरोघरी जावून पुस्तके, नोट्स, मास्कचे वाटप केले. तसेच प्रत्यक्ष महाविद्यालय सुरु झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला, निबंध स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धेचेही आयोजन केले. मतदान जनजागृती अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धेत विद्यार्थीनींचा सहभाग, १ जानेवारीला नवीन वर्षातील बदल व मागील वर्षातील महत्त्वाच्या घटना तसेच जीएसटी सारखे विषयांवर व्याख्यानाचे आयोजन केले. प्रा.पावरा यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्राचार्या सौ.वंदना पाटील, प्रभारी उपप्राचार्य बी.सी.पवार, उपमुख्याध्यापक एस.एम.पाटील यांनी अभिनंदन केले आहे. प्रा.पावरा यांना प्रा.दिनेश सुर्यवंशी, प्रा.वैभव चव्हाण, प्रा.ए.एम.खिंवसरा, प्रा.अक्षय अहिरे, रोहित पटेल, नरेंद्र बोरसे, जितेंद्र चौधरी आदींचे सहकार्य लाभले.