नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागीय कार्यालयातर्फे सर्व आगाराअंतर्गत दि.22 सप्टेंबर ते 6 ऑक्टोंबर पर्यंत प्रवासी तिकिट तपासणी मोहीम अभियान राबविण्यात येत आहे.अशी माहिती विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दि.22 सप्टेंबर पासून प्रवासी तिकीट तपासणी मोहीम पंधरवाडा सुरू करण्यात आला आहे.त्यानुसार धुळे विभागातील नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, नवापूर, दोंडाईचा, साक्री, शिरपूर, आणि धुळे आगारातील सर्व बसेस मधील प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये या बाबींना आळा घालण्याकरीता मोहीम राबविण्यात येत आहे.प्रवासी तिकीट तपासणी मोहीम राबवितांना बस स्थानकावर उतरणार्या प्रवाशांची तिकीट तपासणी करण्यात येईल.बस स्थानकावर आलेल्या स्वतःच्या व इतर विभागाच्या सर्व बसची तपासणी करण्यात येईल.मोहीम राबविताना आगारातील सर्व पर्यवेक्षीय कर्मचारी यांचा समावेश राहणार असून तपासणी करणारे पर्यवेक्षक संपूर्ण कालावधीत गणवेशातच तपासणी करतील.राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपली तिकिटे काळजीपूर्वक जपून ठेवावीत.मोटार वाहन कायदा 1988 नुसार विनातिकीट प्रवास करणार्या व्यक्तींकडून त्यांनी चूकविलेल्या प्रवास भाड्या व्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा रुपये शंभर यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दंड म्हणून वसूल करण्यात येईल.असेदेखील विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी पत्रातून म्हटले आहे.दि.22 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत प्रवासी तिकिट तपासणी अभियान पंधरवडा सुरू राहणार असल्याचे नंदुरबार आगारप्रमुख मनोज पवार यांनी सांगितले.