शहादा l प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांतून शेतकरी बांधवांना कर्ज पुरवठ्याबाबत अडचणी निर्माण होत आहेत.याविषयी शेतकरी बांधवांच्या तक्रारींची दखल घेऊन शेतकरी बांधवांना त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यावे,अशी सूचना बँकेचे व्हाईस चेअरमन दीपक पाटील यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना केली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे, सद्यस्थितीत शेतकरी बांधवांना अस्मानी-सुलतानी संकटास सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांकडे रक्कम उपलब्ध नसल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज मिळावे यासाठी जिल्ह्यातील शेतकरी बांधव आपल्या हक्काच्या बँकेकडे धाव घेत आहेत. कागदपत्रांची पूर्तता करूनही कर्ज पुरवठ्यात विलंब होत असल्याने शेतकरी बांधवांपुढे आर्थिक समस्या उभी राहिली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांनी याबाबत बँकेचे व्हाईस चेअरमन दीपक पाटील यांची शहादा येथे भेट घेऊन विलंब होत असल्याबाबत तक्रार केली होती. श्री.पाटील यांनी दखल घेऊन बँकेचे डीएम जे.डी.गिरासे यांच्यासह अधिकारी- कर्मचाऱ्यांना सूचना केली आहे.शेतकरी बांधवांना विना विलंब कर्ज पुरवठा करण्यात यावा तसेच कर्ज पुरवठ्यासाठी कागदपत्रांच्या अडचणी दूर करून शेतकऱ्यांना त्वरित कर्ज वितरण करावे अशी सूचना केली आहे.








