नंदुरबार । प्रधिनिधी
जिल्हाभरात आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी अंतिम टण्यात एकूण १७४ मंडळांकडून गणरायाला निरोप देण्यात येणार आहे . कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे . अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला नंदुरबार शहरातून पोलिसांतर्फे रुट मार्च काढण्यात आला .
नंदुरबार जिल्ह्यात यंदा एकूण ७६५ मंडळांकडून गणरायांची स्थापना करण्यात आली होती .गेल्या १० दिवसांपासून मुक्कामाला असणाऱ्या गणरायाला आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यासाठी मोठी मंडळे सज्ज झाली आहेत . अंतिम टप्यात १७४ मंडळांकडून निरोप देण्यात येणार आहे . यामध्ये सार्वजनिक १११ , खासगी ५३ तर एक गाव एक गणपती १० अशा १७४ मंडळांकडून गणरायाला निरोप देण्यात येणार आहे . यापार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे . काल पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत , अपर पोलिस अधिक्षक विजय पवार , स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर आदींच्या मार्गदर्शनाखाली शहरातून पोलिसांतर्फे रुट मार्च काढण्यात आला . कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने जिल्हाभरात दीड
हजारावर पोलिस अधिकारी , कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . यामध्ये एक पोलिस अधिक्षक , एक अप्पर पोलिस अधिक्षक , चार पोलिस उपअधिक्षक , वीस पोलिस निरीक्षक , ७४ सहाय्यक पोलिस निरीक्षक तसेच उपनिरीक्षक , ८५५ पुरुष पोलिस कर्मचारी , १४१ महिला पोलिस कर्मचारी , ५०० पुरुष होमगार्ड , १०० महिला होमगार्ड , सात स्ट्रायकिंग फोर्स , दोन आरपी व क्यूआरटी प्लाटून तसेच एक एसआरपी कंपनी असा मजबूत पोलिस बंदोबस्त पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात आला आहे .
असे असले तरी कोरोना प्रादुर्भावाचे पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन होवू नये यासाठी मिरवणूका न काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे . यापार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे ठिकठिकाणी शांतता कमिटी व गणेश मंडळांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या . यामध्ये कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन यापुर्वीच करण्यात आले आहे .